धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त
---
दानपेटी चोरणारा
धुळ्यात अटकेत
धुळे ः मंदिरात चोरी करून दानपेटी लांबविणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले. अंधारात स्वतःचे अस्तित्व लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याच्या संशयित हालचालींवरून गस्ती पथकाने ही धडक कामगिरी बजावली. शहरातील साक्री रोडवरील श्री संतोषीमाता मंदिर परिसरातील श्री मरीमाता मंदिरात रविवारी (ता. १५) रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी एक हजार किमतीची लोखंडी दानपेटी व त्यातील सहा हजारांची रोकड नेली होती. याप्रकरणी सोमवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी पोलिसांचे गस्तीपथक परिसरात शोध घेत असताना शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या आवारातील झाडाझुडपांमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरीची लोखंडी दानपेटी आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान त्याने मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. आकाश भीमराज नागापुरे (रा. मोगलाई, गवळीवाडा, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
---
जनावरांची वाहतूक;
तिघांविरुद्ध गुन्हा
धुळे ः गोवंश जातीच्या दोन गायी आणि एका वासराची पिण्याच्या पाण्याविना व चाऱ्याशिवाय दाटीवाटीने आणि निर्दयीपणे होणारी वाहतूक मोहाडी पोलिसांनी उधळून लावली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोवंशासह पिक-अप वाहन जप्त करण्यात आले आहे. पिक-अप वाहनातून (एमएच ०४, एफडी ८१८४) ही अवैध वाहतूक सुरू होती. गुरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता पिक-अपमध्ये दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. धुळे-चाळीसगाव रोडवरील मोहाडी शिवारालगत एका फार्म हाऊसजवळ हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गोवंश व वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस नाईक विवेक साळुंके यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब दिलीप गढरी (वय ३०), संभाजी बुधा मंग (वय ६०, दोघे रा. इंदिरा नगर, शिरूड, ता. धुळे) आणि शकील (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
अवधानला तरुणाची
घरात आत्महत्या
धुळे ः शहरालगतच्या अवधान येथील आनंदनगर परिसरातील ३२ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १७) घडली. संदीप अशोक पाटील, असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीप पाटील याने १७ नोव्हेंबरला सकाळी नऊ ते दुपारी एक यादरम्यान घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---
विवाहित तरुणाची
धुळ्यात आत्महत्या
धुळे : विषारी औषध प्राशन करून तुषार नंदकिशोर सातभाई (३२, रा. धुळे) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. १५ नोव्हेंबरला सकाळी सातच्या सुमारास तुषार याने पत्नीला झोपेतून उठवून आपण विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार हिवरकर तपास करत आहेत.