34531, 34532
धुळे : अभय विद्यालयात ''सार्थक दिवाळी'' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याना फराळ वाटप करताना बी. एम. पाटील, विश्वंभर दासरवाळ, शुभम पाटील, संजय पवार आदी. दुसऱ्या छायाचित्रात श्री पिंपळादेवी विद्यालयात पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेताना विद्यार्थी. शेजारी शिक्षक.
--
पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत दिवाळी करा साजरी
धुळ्यात शाळांमध्ये उपक्रम; प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा उत्सव! मात्र या आनंदोत्सवात पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे. हाच सामाजिक विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शहरातील विविध विद्यालयांमध्ये अभिनव उपक्रम झाले. पर्यावरण रक्षणाचा वसा घेत विद्यार्थ्यांनी फटाक्यांशिवाय आणि प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. तर काही शाळांमध्ये गरजूंसाठी फराळ वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
-
पिंपळादेवी विद्यालय
मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हरित सेनेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचा सामूहिक शपथ घेण्यात आला. हरित सेनेच्या प्रमुख व्ही. बी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ दिली. कलाशिक्षक बी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनात कलाशिक्षक योगेश वाघ यांनी काळ्या फलकावर रंगीत खडूंच्या साहाय्याने ''प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया!'' हा संदेश मांडला. उपक्रमाचे संस्थाध्यक्ष विनायक शिंदे, संचालक एस. बी. पाटील, एस. डी. बाविस्कर, व्यवस्थापक आर. व्ही. पाटील, के. आर. सावंत, समन्वयक व्ही. बी. बोरसे, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. आर. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे यांनी कौतुक केले.
-
अभय विद्यालय
अभय माध्यमिक उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विद्यालय येथे प्राचार्य संजय पवार यांच्या संकल्पनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी ''सार्थक दिवाळी'' उपक्रमांतर्गत फराळ वाटप झाले. अभय युवक कल्याण केंद्राचे ओएस डॉ. बी. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वंभर दासरवाळ, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शुभम पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा घेतली आणि आकाशकंदील स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. प्राचार्य पवार यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक एम. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रशेखर तोरवणे यांनी आभार केले.
-
विसपुते विद्यालय
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी झाली. फटाक्यांची आतषबाजी टाळून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण रोखण्यावर भर देण्यात आला, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक व पशुपक्ष्यांना होणारा त्रास टळेल. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे न करण्याचा निर्णय घेत वसुंधरेचा समतोल राखण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
-
एकनाथ महाराज हायस्कूल
अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित रानमळा (ता. धुळे) येथील एकनाथ महाराज हायस्कूल येथे पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थ्यांना सामूहिक शपथ देण्यात आली. मुख्याध्यापक के. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण आणि त्यामुळे रुग्ण व पशुपक्ष्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली. या प्रसंगी नित्यानंद पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिष्टान्न पदार्थांचे वाटप करण्यात आले. शिक्षक संजय सूर्यवंशी, चंद्रकांत भदाणे, सचिन पावरा, मंगला देसले, कर्मचारी सुभाष शिंदे व शकील उस्मान यांनी संयोजन केले.