धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- साक्री तालुक्यात वीज तारा लंपास धुळे : रोहणे व नवनगर (ता. साक्री) शिवारातील शेतांमधून तसेच स्टोन क्रेशरजवळील सार्वजनिक जागेतून ५४ हजार ४०० किमतीच्या वीज तारा चोरीस गेल्या. ही घटना १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान घडली. चोरट्यांनी गट क्रमांक ७४/७५, ६४ व ६५ मधील शेतांमधून आणि उज्ज्वला दहिते यांच्या स्टोन क्रेशरजवळील जागेतून २६ हजार ४०० रुपये किमतीची ७५० मीटर लांबीची जुनी लघुदाब वाहिनीची तार आणि २८ हजार रुपये किमतीची ७०० मीटर लांबीची जुनी उच्चदाब वाहिनीची तार लंपास केली. याप्रकरणी महावितरण कंपनीच्या पिंपळनेर उपविभागाचे सहायक अभियंता अमोल ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - गोवंश मांस विक्रीसाठी बाळगणाऱ्यावर गुन्हा धुळे : शहरातील मच्छीबाजार परिसरात विनापरवाना गोवंशाचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी अबुबकर गुलाम गौस सौदागर (रा. मच्छीबाजार, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही कारवाई २५ ऑक्टोबरला फारूकीय्या चौकातील हैदर डेअरीलगत करण्यात आली. संबंधित व्यक्ती गोवंशाचे मांस विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी त्याच्याकडून मांस, वजनकाटा व सुरा, असा एकूण चार हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मकसुदखान पठाण यांच्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - विषारी औषधामुळे महिलेचा मृत्यू धुळे : विषारी औषध प्राशन केल्याने मंगल अशोक पाटील (वय ५६, रा. मोराणे, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. २५) सकाळी त्यांना उलटी झाल्याने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. - ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार धुळे : नरडाणा ते वारुड (ता. शिंदखेडा) मार्गावर ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने भावेश प्रेमराज कोळी (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला, तर समाधान प्रभाकर कोळी (वय २२) गंभीर जखमी झाला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ २५ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. समाधान कोळी व त्याचा चुलत भाऊ भावेश कोळी (दोघे रा. भिलाली, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे नरडाणा रेल्वेस्थानकावरून दुचाकीने (एमएच ५४ डी ६८५६) गावी जात होते. वारुडकडे जाणाऱ्या मार्गावर समोरून आलेल्या ट्रकच्या (एमएच ४१ एयू ५२२०) चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक चालवून दुचाकीला धडक दिली. यात भावेश याचा मृत्यू झाला, तर समाधान जखमी झाला. याप्रकरणी समाधान कोळी याच्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार धुळे : साक्री- धुळे महामार्गावरील कोंडाईबारी परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने अमित अशोक गांगुर्डे (रा. धरमपूर, जि. वलसाड, गुजरात) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नारायण माळी (रा. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. उदवाडा, ता. पारडी, जि. वलसाड) हे जखमी झाले. २४-२५ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अक्षय माळी व त्यांचे सोबती दुचाकीने (जीजे १५ ईएन ९८६३) प्रवास करीत असताना मागून आलेल्या कंटेनरने (एचआर ५५ एटी ८५२७) दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरारी झाला. याप्रकरणी अक्षय माळी यांच्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com