धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 34341
धुळे : बनावट दारूसाठ्यासह तपासणीवेळी उपस्थित एलसीबीचे अधिकारी व कारवाई पथक.
--
बनावट दारूसाठीचे स्पिरीट जप्त
-
एलसीबीची कारवाई; आयशरसह ३१ लाखांचा माल जप्त
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : मुंबई- आग्रा महामार्गावरील शिरपूर शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत बनावट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे १४ हजार लिटर स्पिरीट जप्त केले. हॉटेल शिमला परिसरात केलेल्या या कारवाईत आयशर वाहन, मोबाईलसह एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी नरेंद्रकुमार तुलाकांत झा (वय ३५, मूळ रा. सीतामढी, बिहार, सध्या रा. विराजवाटिका, मोराई, ता. वलसाड, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई- आग्रा महामार्गावरून आयशर वाहनात बनावट दारूसाठीचे स्पिरीट वाहून नेले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने शिरपूर शिवारातील हॉटेल शिमला परिसरात सापळा रचला.
यावेळी राजस्थान पासिंगच्या (आरजे ०९ जीई ९०३०) आयशर वाहनाला अडवून तपासणी केली असता, त्यात ७० ड्रममध्ये भरलेले २१ लाख रुपये किमतीचे १४ हजार लिटर स्पिरीट आढळले. पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे आयशर, २१ लाखांचे स्पिरीट आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अंमलदार जितेंद्र अहिरराव, नरेंद्रसिंग गिरासे, योगेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.