धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त --- पितापुत्राला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा धुळे : घरगुती किरकोळ कारणावरून बोधगाव (ता. साक्री) येथे पितापुत्राला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. जिभाऊ उत्तम बागूल (वय ६८, रा. बोधगाव, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार राजेंद्र गुलाब बागूल, देविदास बागूल आणि जिभाऊ बागूल यांनी त्यांना व त्यांच्या मुलाला मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - कुट्टी मशिनचे कटर शेतातून चोरीला धुळे : लामकानी (ता. धुळे) शिवारातील सुबाभळीच्या शेतातून ट्रॅक्टरवर चालणाऱ्या कुट्टी मशीनचे चार कटर, असे ६५ हजार किमतीचे साहित्य चोरट्यांनी नेले. याप्रकरणी शेतकरी उमेश सुभाष परदेशी यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. - शेतीच्या वादातून घरात घुसून मारहाण धुळे : शेतीच्या जुन्या वादातून घरात घुसून तोडफोड, मारहाण केल्याप्रकरणी आठ संशयितांविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ३५ वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार २४ ऑगस्टला सकाळी आठच्या सुमारास रवींद्र धना मोरे, सुमित मोरे, वैभव मोरे, हरीष मोरे, कल्पना मोरे, लता मोरे, संगीता मोरे आणि कैलास मोरे यांनी तिच्या घरात घुसून तोडफोड केली. तिच्या पतीला व मुलांना मारहाण करून काटेरी झुडपांत फेकून दिले. याप्रकरणी तीने १८ ऑक्टोबरला सायंकाळी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. - जुन्या वादातून दोन गटात हाणामारी धुळे : हेंकळवाडी (ता. धुळे) येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत महिला व तरुण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. सुधाकर अंबर पवार (वय ३२) यांच्या फिर्यादीनुसार १७ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास रितेश चव्हाण, बबलू चव्हाण, लुकड्या चव्हाण, गलेबा चव्हाण, सुकड्या चव्हाण, साहेल चव्हाण आणि सुपर पवार यांनी लोखंडी पाइपने मारहाण करून त्यांना जखमी केले. दुसऱ्या बाजूने चिनाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास मनिष पवार, शामील पवार, आमसुल पवार, कालीदास पवार, रामदास पवार, मुन्ना भोसले आणि आसिम भोसले यांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. - आर्वी शिवारात संशयित ताब्यात धुळे : आर्वी (ता. धुळे) शिवारात शेतातील विहिरीजवळ अंधारात लपून बसलेल्या ऋषभ भागवतप्रसाद जयस्वाल (वय ३१, रा. कापूरबावडी, ठाणे) या संशयिताला धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. नऊ ऑक्टोबरला रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई केली. श्रावण रामदास माळी यांच्या शेतातील विहिरीजवळ संशयास्पदरीत्या फिरताना तो पोलिस पथकाला आढळला. त्याच्या अंगझडतीत लोखंडी पकड आणि स्क्रू ड्रायव्हर अशी साधने मिळाली. पोलिसांनी ती जप्त केली. रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार जयस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - कारच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू धुळे : शेंदवाडे (ता. शिंदखेडा) येथे भरधाव कारच्या धडकेत धनश्री प्रवीण शिंदे (वय ५) या चिमुकलीचा मृत्यू झाला. १३ ऑक्टोबरला दुपारी अडीचच्या सुमारास ती घराजवळील किराणा दुकानासमोर रस्त्यावर खेळत होती. त्या वेळी कारने (एमएच १२ एमडब्ल्यू ८४०८) तिला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या धनश्री हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिचे मामा तातूस साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -
Marathi News Esakal
www.esakal.com