धुळे : टुडे पान १ साठी..मेन
--
पावसाची दडी अन् पंचनाम्यांची संथ गती!
--
जिल्ह्यात अद्याप केवळ २५ टक्केच पंचनामे पूर्ण; खरीप हंगाम पूर्णपणे वाया
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे यंदा खरीप पिके पूर्णपणे जळून गेली आहेत. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पडझडीच्या काळात शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. मात्र, ही पंचनाम्याची सरकारी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २५ टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली होती. जिल्ह्यातील चारही तालुक्यांत मिळून तीन लाख ७४ हजार ९६४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यात धुळे तालुक्यात एक लाख ११ हजार ९७ हेक्टर, साक्री तालुक्यात ९८ हजार ३३४ हेक्टर, शिरपूर तालुक्यात ७० हजार २०५ हेक्टर आणि शिंदखेडा तालुक्यात ९५ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रावर पिके उभी होती. परंतु, पावसाने लांबणी घेतल्यामुळे कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन ही सर्व पिके जागेवरच पिवळी पडून करपली आहेत. कपाशीला बोंडे लागली पण पाण्याअभावी ती फुटलीच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघालेला नाही.
-
सरसकट मदतीची मागणी
बँकांचे कर्ज, सावकरांकडून घेतलेले पैसे कसे फेडायचे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मुलांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पिके पूर्ण जळाल्यामुळे नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवून शेती मोकळी केली आहे. त्यामुळे या रखडलेल्या पंचनाम्यांऐवजी शासनाने तातडीने सरसकट एकरी मदत द्यावी, अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
केवळ २५ टक्केच पंचनामे
जिल्ह्यात तीन लाख चार हजार ३६३ शेतकरी खातेदार आहेत. यात तीन ऑक्टोबर पर्यंत केवळ १३१ गावांमधील ८६ हजार ४०३ शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे झाले आहेत. क्षेत्रानुसार एकूण पेरणी क्षेत्रापैकी अवघ्या ९४ हजार ५६८ हेक्टर म्हणजेच केवळ २५.२२ टक्के भागाचेच पंचनामे कागदावर आले आहेत. यात शिरपूर तालुक्यात ३२.५० टक्के, शिंदखेड्यात २५.५१ टक्के, धुळे तालुक्यात २४.२२ टक्के तर साक्री तालुक्यात सर्वात कमी २०.८८ टक्के पंचनामे झाले आहेत.
-