धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन
--
फोटो क्रमांक ः 32409...भाग्यश्री विसपुते
--
दुष्काळातही धान्याचा पुरेसा साठा
-
भाग्यश्री विसपुते : १४ लाखांवर लाभार्थ्यांना मोफत वाटप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : दुष्काळी स्थितीतही जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या गरजेपेक्षा अधिक धान्याचा पुरवठा झाला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १४ लाख ३० हजार १६ लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
-
जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री या चारही तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय गोदामांमध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी सुमारे एक लाख ३४ हजार ८०० क्विंटल धान्याची गरज आहे. प्रत्यक्षात एक लाख ६८ हजार ९६० क्विंटल गहू, तांदूळ आणि ज्वारीचा पुरवठा झाला आहे.
-
पात्र कुटुंबांचा शोध
सप्टेंबरमध्ये अंत्योदय अन्न योजनेतील तीन लाख २१ हजार ९१ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील ११ लाख आठ हजार ९२५ अशा एकूण १४ लाख ३० हजार १६ लाभार्थ्यांना ऑनलाइन वितरण प्रणालीद्वारे मोफत धान्य मिळाले. ऑक्टोबरमधील धान्यवाटपही सुरू झाले आहे. अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना योजनेत समाविष्ट करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यासाठी शिधापत्रिकेतील सदस्यांचे आधार संलग्नीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यावर भर दिला जात आहे.
-
वंचित राहू नये
रोजगारासाठी स्थलांतर केलेल्या पात्र कुटुंबांनाही धान्य मिळू शकणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पोर्टेबिलिटी सुविधेमुळे लाभार्थ्यांना मूळ गावातील रास्तभाव दुकानाऐवजी सोयीच्या अन्य दुकानातून धान्य घेता येईल. दुष्काळी स्थितीत एकही पात्र कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुरेसा साठा, नियमित वितरण आणि पात्र कुटुंबांचा योजनांमध्ये समावेश याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विसपुते यांनी दिले.
-