धुळे टुडे २ साठी...
---
घरे नियमितीकरण आदेशाची अंमलबजावणी करा
---
विनोद जगताप; धुळे महापालिका आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २८ : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीच्या बांधकामांना नियमित (रेग्युलाईज) करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका क्षेत्रातील मिल परिसरातील विविध वस्त्यांमधील १५ ते २० हजार घरे आणि बांधकामे तातडीने नियमित करावीत, अशी मागणी विनोद जगताप यांनी धुळे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
मिल परिसरातील रासकर नगर, विखे नगर, गुरुकृपा नगर, तुळसाबाईचा मळा, शेलारवाडी, राऊळवाडी, लिलाबाईची चाळ, धनगर वाडा, हटकरवाडी, श्रीराम नगर, अयोध्या नगर, नारायण मास्तरची चाळ आणि फाशीपूल परिसर या सर्व वस्त्या गेल्या ४० ते ५० वर्षांपासून अस्तित्वात आहेत. या परिसरातील रहिवासी हे अत्यंत सर्वसामान्य, गोरगरीब आणि मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवणारे आहेत. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे या वस्त्यांना आजवर हक्काची कागदपत्रे व मान्यता मिळण्यात अडथळे येत होते.
मुख्यमंत्र्यांचा निर्णयाने दिलासा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून २०११ पूर्वीची बांधकामे नियमित करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या शासन निर्णयामुळे धुळे शहरातील मिल परिसरातील जुन्या वस्त्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, असे श्री. जगताप यांनी म्हटले आहे.
तातडीने कार्यवाही करावी
शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून धुळे महापालिकेने या सर्व वस्त्यांमधील बांधकामांना तातडीने नियमित करण्याचे आदेश काढावेत. यामुळे येथील १५ ते २० हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या हक्काच्या घरांच्या विकासाला आणि पुढील वाटचालीस चालना मिळणार आहे. महापालिकेने या प्रकरणी सकारात्मक व तत्काळ पावले उचलल्यास गोरगरीब नागरिकांमध्ये प्रशासनाची एक अत्यंत लोकभिमुख आणि स्वच्छ प्रतिमा निर्माण होईल, असा विश्वासही श्री. जगताप यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
---