धुळे : टुडे पान १ साठी..
--
विनापरवाना शेतमाल खरेदी
करणाऱ्यांवर होणार कारवाई
-
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम व नियमामधील कायदेशीर तरतुदींनुसार शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यापारी, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इतर घटकांना बाजार समितीचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, धुळे तालुक्यात काही खासगी व्यक्ती व व्यापारी कोणताही परवाना न घेता थेट शेतकऱ्यांच्या घरून तसेच बांधावरून शेतमालाची अवैधपणे खरेदी-विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बिगरपरवाना व्यवहारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने कठोर भूमिका घेतली आहे. बाजार समितीच्या धुळे तालुका कार्यक्षेत्रात कोणत्याही विनापरवाना व्यापाऱ्याने शेतमालाची बेकायदेशीर खरेदी करू नये, अन्यथा संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहून खाजगी किंवा विनापरवाना व्यापाऱ्यांना परस्पर शेतमाल विकू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान व फसवणूक टळेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती योगेश पाटील आणि सचिवांनी केले आहे.