धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....
--
विनापरवाना धान्य खरेदीदारांवर कारवाईचा इशारा
--
साक्री बाजार समितीची व्यापाऱ्यांना नोटीस; मालमत्ता जप्तीचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १३ : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात विनापरवाना कापूस व अन्नधान्याची बेकायदेशीर खरेदी, तसेच साठवणूक केली जात असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी बाजार समिती प्रशासनाने भूमिका घेतली असून, नियमबाह्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अंतिम नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे थेट फौजदारी कारवाई आणि मालमत्ता जप्तीचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार परवाना न घेता खरेदी- विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या बेकायदेशीर व्यवहारांमुळे बाजार समितीची बाजार फी आणि शासनाची सुपरव्हिजन फी बुडून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वी सूचना देऊनही खेडा धान्य खरेदी सुरूच ठेवल्याने बाजार समिती सचिवांनी अंतिम नोटीस बजावून कठोर पावले उचलली आहेत. या नोटीशीद्वारे व्यापाऱ्यांना खेडा धान्य खरेदी तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आतापर्यंत केलेल्या सर्व खरेदीचा संपूर्ण हिशोब तीन दिवसांच्या आत बाजार समिती कार्यालयात सादर करून देय असलेली बाजार फी, सुपरव्हिजन फी आणि दंडात्मक रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्देशांचे पालन न केल्यास कृषी उत्पन्न पणन अधिनियमानुसार खरेदीचे ठिकाण सील करून बेकायदेशीर साठा, वजनकाटे आणि वाहतूक करणारी वाहने जप्त केली जातील. थकीत रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव पाठवून व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.