धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...
--
फोटो क्रमांक : 31689 - लोगो
--
धुळ्यात रविवारी जिल्हा मराठी साहित्य संमेलन
--
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : अहिराणी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत साहित्य भारतीय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) धुळ्यात सहाव्या जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आर्थिक अनुदान लाभल्याची माहिती अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील यांनी दिली.
-
या एक दिवसीय जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शहराचे आमदार अनुप अग्रवाल असून, संमेलनाध्यक्षपद प्रा. एल. जी. सोनवणे भूषवणार आहेत. साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील आणि कवी प्रकाश होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह आमदार अमरीशभाई पटेल, राम भदाणे, मंजुळा गावित, काशीराम पावरा आदी मान्यवर उपस्थित राहतील.
-
दिवसभर चालणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनात एकूण दहा विविध सत्रे असणार आहेत. यात परिसंवाद, साहित्यिकांची प्रकट मुलाखत, गझल संमेलन, निमंत्रित कवींचे संमेलन यांचा समावेश आहे. तसेच, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, काव्य लेखन आणि कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्यांचा निकाल व पारितोषिक वितरण संमेलनाच्या समारोप सत्रात केले जाईल. या संमेलनाला धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील साहित्यिक, कवी आणि वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अहिराणी साहित्य परिषद व साहित्य भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.