अधिष्ठात्यांचा लघुलेखकच जाळ्यात
---
हिरे मेडिकलला मध्यस्थासह लाच घेताना अटक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ ः ऐन दिवाळीत येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अधिष्ठात्यांचा लघुलेखक सुदेश मानकर (वय ५५) याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. धनत्रयोदशीला दुपारी साडेतीनच्या सुमारास शुक्रवारी (ता. ६) अधिष्ठात्यांच्या कार्यालयात ही कारवाई झाली. या प्रकरणी मध्यस्थाची भूमिका बजावल्याच्या आरोपावरून श्रीराम शंकर मोरे यालाही ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार शासकीय कर्मचारी असून, दीर्घकालीन रजेनंतर सेवेत रुजू होण्यासाठी त्यांना वैद्यकीय समितीचे प्रमाणपत्र आवश्यक होते. हे काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागितल्याचा आरोप आहे. पैकी पाच हजार रुपये मोरे याने मध्यस्थी करत स्वीकारले, तर उर्वरित दहा हजार रुपये मानकर याने कार्यालयात स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या पथकाने त्याला पकडले. संशयित दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंतर त्यांना अटक झाली. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी केले. पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, रामदास बारेला यांनी ही कारवाई केली.