धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
पान एक संक्षिप्त ------------------ मोहाडी परिसरात सांगाडा आढळला धुळे : मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेक्सा शोरूममागील ओम श्री कंपनीच्या गोदामाच्या भिंतीआडोसाला एका ३० ते ४० वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा कुजलेला आणि अर्धवट सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी (ता.१५) सायंकाळी सुरक्षारक्षक नितीन मारनर यांना ड्यूटीवर फेऱ्या मारत असताना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी व्यवस्थापक संदीप गंगावणे यांना ही माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, निरीक्षक शिल्पा पाटील व उपनिरीक्षक नितीन करंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मारनर यांच्या माहितीनुसार मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. जागेच्या वादातून दोघांविरूद्ध गुन्हा धुळे : देउर बुद्रुक (ता. धुळे) येथे जागेची हद्द आणि मालकीच्या कारणावरून झालेल्या वादातून संशयित दिलीप आनंदा चौधरी आणि सुनील दिलीप चौधरी यांनी वाद घातला. त्यांनी फिर्यादी प्रमोद उत्तम चौधरी यांच्या घराच्या ओट्याची व पायऱ्यांची हातोड्याने तोडफोड केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि हातातील हातोड्याने पायावर प्रहार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार अमोल बोरसे तपास करत आहेत. -- संभाप्पा कॉलनीतून तरुण बेपत्ता धुळे : धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील संभाप्पा कॉलनी येथून गौरव शशिकांत थोरात (वय २७) हा तरुण घराबाहेर गेल्यावर सायंकाळपर्यंत घरी परतला नाही आणि फोनवरही संपर्क होऊ शकला नाही. नातेवाईक व परिसरात शोधाशोध करूनही तो न सापडल्याने, अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने फिर्यादी शशिकांत रमेश थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -- बसच्या धडकेत महिला ठार धुळे ः कुरुकवाडे (ता. शिंदखेडा) येथील पाटील कुटुंब रिक्षाने बिजासनी मंदिरात दर्शनासाठी जात असताना विरदेल शिवारातील पुलाजवळ शिंदखेडा आगाराच्या भरधाव एसटी बसने रिक्षाला धडक दिली. या अपघातात वंदनाबाई ज्ञानेश्वर पाटील (वय ६०) या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याबाबत विनोद ज्ञानेश्वर पाटील यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, बसचालक नंदलाल सीताराम कोळी (रा. बेटावद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सोनवणे तपास करत आहेत. -- विवाहीत तरुणाची धुळ्यात आत्महत्या धुळे : विषारी औषध प्राशन करून तुषार नंदकिशोर सातभाई (३२, रा. धुळे) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पंधरा नोव्हेंबरला सकाळी सातला तुषार याने पत्नीला झोपेतून उठवून आपण विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. नातेवाइकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. -- रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू धुळे: सुरत ते भुसावळ मेनलाईनवर जातोडा (ता. शिंदखेडा) गावाजवळ रेल्वे पोल क्रमांक २२७/२० जवळ सुरतवरून भुसावळकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसची (गाडी क्र. १९०४५) धडक बसून ३५ ते ४० वयोगटातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. नरडाणा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, हवालदार देसले तपास करत आहेत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.