धुळे ः टुडे १ साठी, अँकर
---
सूचना ः गरजेनुसार, जागा उपलब्धतेनुसार मनपा इमारतीचा लोगो घेणे.
---
मनपा वाढीव मालमत्ता कराला स्थगिती
शर्मानगरातील मालमत्तेचे प्रकरण; २ नोव्हेंबरला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ ः महापालिकेच्या वाढीव मालमत्ता कर आकारणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. शर्मा नगरातील मालमत्ता क्रमांक १९३६ (सीटीएस क्रमांक १६८) संदर्भातील ११ डिसेंबर २०२३ आणि ९ एप्रिल २०२६ च्या कर बिलांच्या अंमलबजावणीला ही स्थगिती आहे. न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
शर्मा नगरातील (स्व.) द्रौपदाबाई बारकू साळुंखे यांच्या मालमत्तेसंदर्भात त्यांचे कायदेशीर वारस राजू बारकू साळुंखे यांनी याचिका दाखल केली आहे. वाढीव कर बिलांविरोधात २९ डिसेंबर २०२३ ला लेखी आक्षेप नोंदवूनही महापालिकेने सुनावणी घेतली नाही किंवा आक्षेपांवर निर्णय दिला नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. मालमत्तेचे वय, घसारा आणि जीआयएस मॅपिंगमधील त्रुटींकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
याचिकाकर्त्यांतर्फे ‘प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र शासन’ या प्रकरणातील न्यायालयीन निर्देशांचा संदर्भ देण्यात आला. कर आकारणीपूर्वी नागरिकांचे आक्षेप ऐकून घेऊन त्यांना सुनावणीची योग्य संधी देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने राज्य शासन आणि धुळे महापालिकेला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.