धुळे : टुडे पान २ साठी..
--
वडजाई रोड भुयारी रस्ता
दुरुस्तीचा मार्ग मोकळा
--
मुजफ्फर हुसेन यांच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : वडजाई रोड टेलिव्हिजन टॉवरजवळील भुयारी रस्ता व सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे आणि पथदिव्यांच्या अभावामुळे पसरलेला अंधार यामुळे वाहनधारक, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या मार्गाला लागूनच कब्रस्तान तसेच मनपा शाळा क्रमांक चार व पाच असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. अंधारामुळे रात्रीच्या वेळी अपघातांसोबतच चोऱ्यांची भीतीही वाढली होती.
या समस्येची दखल घेत काँग्रेसचे माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन दोस्त महमंद यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ते दुरुस्ती व पथदिवे बसविण्याची मागणी केली होती. तसेच, त्यांनी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडेही पाठपुरावा केला. माजी नगरसेवकांच्या या निवेदनाची दखल घेत खासदार बच्छाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या. प्रशासनाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या सुरक्षाविषयक कामांना अखेर मंजुरी देण्यात आली आहे. भुयारी रस्ता व सर्व्हिस रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून तिथे पथदिवे बसवण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले.