धुळे : टुडे पान १ साठी.. अवतीभवती
--
क्रीडा पुरस्कारांसाठी
अर्जाचे आवाहन
धुळे : मैदानावर यश मिळवणारे खेळाडू, मार्गदर्शक, साहसवीर आणि दिव्यांग खेळाडूंच्या गुणवत्तेचा राज्यस्तरावर गौरव करण्यासाठी ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२४- २५ आणि २०२५- २६ या दोन वर्षांसाठी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा विभागामार्फत जीवन गौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग) प्रदान केले जातात. सुधारित नियमावली २०२३ नुसार ही निवड होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी केले आहे.
--
धुळ्यात आज
बालाजी पालखी
धुळे : येथील ऐतिहासिक श्री बालाजी मंदिरात नवरात्र ब्रह्मोत्सव उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवात दहा दिवस श्री बालाजी विविध वाहनांवर आरूढ होऊन नगर भ्रमण करतात. एकादशीला श्री बालाजी रथावरून नगरात भ्रमण करतात. या ब्रह्मोत्सव आणि पालखी उत्सवाचे यंदा १४७ वे वर्ष आहे. या ब्रह्मोत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला पालखी उत्सवाने होते. पांझरा नदीवर अमृत स्नान करून श्री बालाजी गरुड बागेत गरुड परिवाराकडे विश्राम करण्यासाठी येतात. सोमवारी (ता. २६) पालखी उत्सव होणार आहे. भाविकांनी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत गरुड बागेतील व्यंकटेश लॉन्स येथे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गरुड परिवाराचे प्रणव गरुड यांनी केले आहे.
--
ओबीसी विद्यार्थ्यांना
शैक्षणिक कर्ज परतावा
धुळे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ राबवली जात आहे. उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमांसाठी कमाल १० लाख रुपये व परदेशातील अभ्यासासाठी २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध असून, कर्जावर वार्षिक १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा थेट अनुदान स्वरूपात आधारसंलग्न खात्यात जमा होणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे. अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे व १२ वीत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. परदेशातील अभ्यासक्रमासाठी संस्था QS जागतिक क्रमवारीत असावी तसेच GRE, TOEFL पात्रता आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करून महामंडळाचे आशयपत्र मिळवावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या साक्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--
तापमानाचा पारा
३५ अंशांच्या खाली
धुळे : ऑक्टोबर हिटमुळे धुळेकर नागरिक त्रस्त झाले होते. मात्र २६ दिवसानंतर तापमानाचा पारा ३५ अंशांच्या आत आला. रविवारी (ता. २५) सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात ३४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे धुळेकरांना काहीसा दिलासा मिळाला. सप्टेंबर महिन्यातील २७ तारखेला तापमान ३४ अंश नोंदवण्यात आले होते. नंतर सातत्याने ३५ ते ३६ अंश तापमान होते. ऑक्टोबरमध्ये चार दिवस तर तापमानाचा पारा ३७ अंशापेक्षाही अधिक होता. २६ दिवसानंतर गुरुवारी (ता. २२) तापमानाचा पारा हा ३५ च्या आत ३४ अंश नोंदवला गेला. तसेच रविवारी (ता. ३४) अंश तापमान आहे. काही प्रमाणावर ढगाळ वातावरण आणि पहाटे वर रात्री उशीरानंतर वाजणारी थंडी यामुळे उन्हापासून काही प्रमाणावर सुटका झाली आहे.
--