NSK26H32569
धुळे : धनगर समाजाचा ‘एसटी’मध्ये आरक्षण करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चात सहभागी झालेले समाजबांधव.
-------
हक्काच्या आरक्षणासाठी प्रत्येकाने ताकद लावावी
दीपक बोराडे : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी धुळ्यात महामोर्चा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एसटी आरक्षणाचा शब्द दिला आहे. आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. प्रत्येकाने दीपक होऊन हक्काच्या आरक्षणासाठी ताकद लावावी’, असे आवाहन मल्हारयोद्धा दीपक बोराडे यांनी केले.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी गुरुवारी (ता. १५) शहरात महामोर्चा काढण्यात आला. आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा क्युमाईन क्लबजवळ महामेळाव्यात रूपांतरित झाला. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकसह राजस्थानमधून हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बोराडे म्हणाले, धनगर समाजावर गेल्या आठ दशकांपासून अन्याय होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत एसटी आरक्षणाचे लिखित आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोलापूर येथे आरक्षणाचे वचन दिले होते. मात्र, बारा वर्षांनंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आम्ही भाजपच्या विरोधात नाही. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला शब्द पाळावा. आमची मते घेऊन सत्तेवर आलेल्यांनी समाजाची फसवणूक केली. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. आता केंद्र आणि राज्य सरकारला शांत बसू देणार नाही. आरक्षण मिळविल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करण्यात आले. महामेळाव्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. मोर्चातील प्रमुख मान्यवरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य सरकारकडे आरक्षणासंदर्भातील निवेदन दिले. मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. धुळे शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अर्चना पाटील, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील आणि आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह सुमारे साडेतीनशे पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात होते.
मोर्चात सुनील वाघ, आप्पा खताळ, अण्णा खेमनार, अमोल मासुळे, विजय पाटील, रमेश सरग, विठ्ठल महानोर, गोपाल माने, गणेश गर्दे, सुभाष सोनवणे, मच्छिंद्र बिडकर, नीलेश नेमाणे, भगवान गर्दे, पंडित मदने, मनोज गर्दे, शैलेंद्र अजगे, छोटू थोरात, किशोर सरगर, रवींद्र मनोरे, संगीता थोरात, मयुरी खेमनार, धनश्री अजगे, ज्ञानेश्वर परदेशी, आनंद बनसोडे, दीपक खताळ, गोरख पाटील आणि सुभाष शिंदे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले.
-------
...तर मुंबईत धडक!
समाजातील मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन करत बोराडे म्हणाले, मी आमदारकी किंवा खासदारकीसाठी नव्हे, तर समाजातील लेकरा- बाळांना एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी लढत आहे. धुळे ही केवळ झलक आहे; मुंबई अजून बाकी आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईत धडक देऊन हक्काचे आरक्षण मिळवू.
---------
महिला, पुरुषांचा मोठा सहभाग
आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा पाचकंदील, जी. टी. कराचीवाला खुंट, पोराळा रोड आणि जुनी महापालिका मार्गे क्युमाईन क्लबजवळ पोहोचला. हातात पिवळे ध्वज, डोक्यावर पिवळ्या टोप्या आणि गळ्यात पिवळे रुमाल परिधान केलेल्या समाजबांधवांनी आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महिला, तरुण आणि पुरुषांचा मोठा सहभाग होता. डफ, संबळ आणि तुतारीच्या निनादात मोर्चेकरी सहभागी झाले.
----------
पिण्याच्या पाण्याची
ठिकठिकाणी व्यवस्था
रणरणत्या उन्हात मोर्चात सहभागी झालेल्या धनगर समाजबांधवांसाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर यांनी जळगाव- धुळे मार्गावरून येणाऱ्या समाजबांधवांसाठी भोजनाची व्यवस्था केली. अकोला- अमरावती विभागीय अध्यक्ष साहेबराव पातोंड यांनी या सहकार्याबद्दल आभार मानले.