32696
धुळे : राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरातील सामान हटविण्यास विरोध करताना राजेंद्र भावसार. दुसऱ्या छायाचित्रात श्री. भावसार यांच्याकडील पेट्रोलची बाटली ताब्यात घेताना पोलिस.
---
नाट्यमंदिरातील सामान हटविताना गोंधळ
एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : शहरातील महापालिका मालकीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरातील यापूर्वीच्या वापरकर्त्याने ठेवलेले सामान हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला संबंधित वापरकर्त्याने विरोध केला. शिवाय अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद तूर्त मिटविण्यात आला. दरम्यान, याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर यापूर्वी भाडे तत्वावर देण्यात आले होते. हा करार कधीच संपल्याने महापालिकेने ते ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नाट्यमंदिराच्या डागडुजीच्या अनुषंगाने मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता.१५) नाट्यमंदिराची पाहणी केली, त्यानंतर शुक्रवारी (ता.१६) महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र माईनकर, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव व पथक तेथे दाखल झाले व नाट्यमंदिरातील सामान हटविण्याची कार्यवाही सुरु केली. या कारवाईला यापूर्वीचे वापरकर्ते राजेंद्र भावसार यांनी विरोध केला. महापालिकेने कोणतीही नोटीस न देता, महापालिकेकडे आपले २२ लाख ७५ हजार रुपये घेणे असताना व याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई का? असे भावसार यांचे म्हणणे होते. यांनतर वाद चिघळल्याने भावसार अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब लक्षात पोलिसांना पाचारण करत बाटली ताब्यात घेतली.
स्टे ऑर्डर नाही
राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिराबाबत भावसार यांच्याकडे न्यायालयाची कोणतीही स्टे ऑर्डर अथवा अनुषंगिक कागदपत्रे नाहीत. असतील तर त्यांनी ती दाखवावीत अशी आमची भूमिका होती असे सहाय्यक आयुक्त माईनकर यांनी सांगितले. दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानुसार यापुढील कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
---
दावा-प्रतिदावा असा
मनपा मालकीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर १८ जानेवारी २०१० ते १७ जानेवारी २०१३ अशा तीन वर्षासाठी मे. श्रीकृष्ण खांडसरी शुगर मिल्स (तळोदा, जि. नंदूरबार) यांना देण्यात आले होते. मनपाच्या बांधकाम विभागाकडील उपलब्ध अभिलेख्यानुसार वेगवेगळे पत्रव्यवहार व न्यायालयात दाखल दाव्यानुसार राजेंद्र मधुकर भावसार हे नाट्यमंदिर मनपा ताब्यात घेईपर्यंत अर्थात १८ जानेवारी २०१३ ते २१ डिसेंबर २०२५ पर्यंत अनधिकृत वापर करत होते असे म्हणत मनपा प्रशासनाने नाट्यमंदिराच्या अनधिकृत वापराच्या भाडेमूल्य निश्चित करत तब्बल १३ कोटी ४५ लाख ३६ हजार ८२८ रुपये अनधिकृत वापरकर्ते राजेंद्र भावसार यांच्याकडून वसुल करण्यात यावी असा अहवाल महासभेपुढे ठेवला होता व तो मंजूरही करण्यात आला आहे. दुसरीकडे आपलेच मनपाकडे २२ लाख ७५ हजार रुपये घेणे असल्याचे श्री. भावसार यांचे म्हणणे आहे.