धुळे ः टुडे १ साठी, जोड
--
बकरी, कापूस चोरीला
३८ हजारांचा ऐवज
धुळे : शेवाडे (ता. शिंदखेडा) येथून बकरी आणि कापूस, असा एकूण ३८ हजारांचा ऐवज नुकताच चोरीला गेला. छोटू झगा कोळी (रा. शेवाडे) यांच्या घराजवळून आठ हजारांची बकरी, तर धनराज पंडित पाटील यांच्या शेतातून ३० हजारांचा सुमारे सात क्विंटल कापूस चोरट्यांनी नेला. याबाबत छोटू कोळी यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
शेतातील शेडमधून
कापूस लांबविला
धुळे : दुसाणे ते विहीरगाव (ता. साक्री) रस्त्यावरील शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून ७० हजारांचा कापूस चोरीला गेला. ही घटना ११ ते १२ ऑक्टोबरदरम्यान घडली. शिवाजी खैरनार (रा. दुसाणे, ता. साक्री) यांच्या शेतातील शेडमध्ये साठवलेला २० क्विंटल कापूस चोरट्यांनी नेला. याबाबत खैरनार यांच्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
आर्वी शिवारात
संशयित ताब्यात
धुळे : आर्वी (ता. धुळे) शिवारात शेतातील विहिरीजवळ अंधारात लपून बसलेल्या ऋषभ भागवत प्रसाद जयस्वाल (वय ३१, रा. कापूरबावडी, ठाणे) या संशयिताला धुळे तालुका पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. श्रावण रामदास माळी यांच्या शेतातील विहिरीजवळ संशयास्पदरीत्या फिरताना तो पोलिस पथकाला आढळला. त्याच्या अंगझडतीत लोखंडी पकड आणि स्क्रू ड्रायव्हर, अशी साधने मिळाली. पोलिसांनी ती जप्त केली. रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार जयस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
रेल्वे अपघातात
प्रवाशाचा मृत्यू
धुळे : वडजाई (ता. धुळे) येथील अंबादास वामनराव वाघ (वय ४९) यांचा रेल्वे रुळांवरील अपघातात मृत्यू झाला. बारा ऑक्टोबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास धुळे येथून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर खांब क्रमांक ३८१/१५ ते ३८२/१ दरम्यान हा अपघात झाला. त्यात वाघ गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
बसच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू
धुळे : साक्री- पिंपळनेर रस्त्यावरील एका पेट्रोलपंपासमोर बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार मजूर देवीदास हिरामण गायकवाड याचा मृत्यू झाला. ही घटना १२ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. गायकवाड (रा. पेरेजपूर, ता. साक्री) दुचाकीने (एमएच १८ एएफ ८०९८) मजुरीसाठी जात असताना बसने (एमएच १४ एमएच ७०२२) त्याला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत दिलबर गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार बसचालक सिद्धेश्वर खराटे (रा. भोगजी, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-