धुळे ः टुडे ३ साठी किंवा खानदेश पानासाठी
--
फोटो क्रमांक ः 33828
धुळे : टायर गोदामाला लागलेली आग.
--
टायर गोदामाला भीषण आग
-
तीन जण जखमी : चाळीसगाव चौफुलीलगत घटना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २८ : येथील चाळीसगाव चौफुली परिसराजवळ हॉटेल कुणालच्या बाजूला असलेल्या एका टायर गोदाम आणि बॅटरी दुकानाला बुधवारी (ता. २८) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चाळीसगाव चौफुलीलगत अब्दुल चौधरी यांच्या मालकीचे महाराष्ट्र बॅटरी हे दुकान आणि दुकान संलग्न टायरचे गोदाम आहे. या गोदामातून सकाळी धूर निघू लागला. गोदामात मोठ्या प्रमाणावर टायर आणि बॅटऱ्यांचा साठा असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
-
अग्निशमन दल दाखल
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या मार्गदर्शनात जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करत अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन वाहनांच्या तब्बल आठ फेऱ्या झाल्या. या मोहिमेत लीडिंग फायरमन राजन महाले, अमोल सोनवणे, सचिन करनकाळ, किरण साळवी, कुणाल ठाकूर, तसेच वाहनचालक निलेश सोनवणे, प्रशांत मुर्तडक, नरेंद्र बागूल, धनंजय खैरनार आणि विनोद थोरात यांनी सहभाग घेतला. या आगीच्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.