धुळे : धसकलपाड्याच्या आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण

टंचाईची झळ : अहोरात्र जागरण
डोक्यावर पाणी घेवून जाताना महिला.
डोक्यावर पाणी घेवून जाताना महिला.Sakal

वार्सा - जिल्हा परिषदेकडून दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होतो. टंचाईसंदर्भात सर्वेक्षण केले जाते. मात्र, ते पारदर्शकतेने होते की नाही, असे प्रश्‍नचिन्ह चोरवडपैकी धसकलपाडा (ता. साक्री) स्थितीने उपस्थित केले आहे. चार महिने टंचाईशी झुंज देणाऱ्या धसकलपाड्याच्या महिलांना पाण्यासाठी रोज एक किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यासाठी अहोरात्र जागावे लागते. धरण उशाला, कोरड घश्‍याला, अशी स्थिती अनुभवणाऱ्या धसकलपाड्याला या दृष्टचक्रातून कोण बाहेर काढेल, असा गंभीर प्रश्‍न आहे.

साक्री शहरापासून सरासरी पंचवीस किलोमीटरपुढे पश्‍चिम पट्ट्यात धसकलपाडा आहे. आदिवासीबहुल या पाड्याची लोकसंख्या सरासरी पाचशेवर आहे. धसकलपाड्यापासून अर्धा किलोमीटरवर गुजरातची सिमा आहे. नागली आणि भात, असे प्रमुख पिक असलेल्या या पाड्यात शेतकरी आणि मजूर कुटुंबे आहेत. नाल्यात गाव पाणीपुरवठ्याची विहीर असल्याने बऱ्याचदा ग्रामस्थांना गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. सहा महिने पाणी मिळते, दोन महिने पावसाळ्यातील अडचणी आणि उर्वरित चार महिने ग्रामस्थांना टंचाईशी सामना करावा लागतो.

पूर्ण दिवस पाण्यासाठीच

धसकलपाड्याच्या पाणीपुरवठा योजनेची विहीर निसाणा धरणाच्या पायथ्याशी आहे. विहीरीला पाणी होते, परंतु शेतकऱ्यांनी आजूबाजूला अधिक खोलगट विहिरी केल्या. परिणामी, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपेक्षा इतर विहिरी खोलगट असल्याने गाव विहिरीची पातळी घसरली. या विहिरीत संकलीत होणारे पाणी तीन दिवसांत सोडले जाते. त्यातून फक्त एखाद- दोन हंडे पाणी मिळते. धसकलपाड्याच्या पूर्वेस शेतात हातपंप असून, तेथूनच महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यासाठी रोज एक किलोमीटर पायपीट करावी लागते. रात्र- रात्र हातपंपस्थळी पाणी संकलन होईपर्यंत पीडित महिलांना बसून राहावे लागते. जंगलाच्या दिशेने पायपीट करूनही एक ते दोन हंडेच पाणी मिळते. पूर्ण दिवस पाण्यासाठीच खर्च होत असल्याने चरितार्थासाठी शेतीची कामे, मजूरी केव्हा करायची, असा ग्रामस्थ महिलांचा प्रश्‍न आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न आहे.

ग्रामस्थ महिलांकडून घेराव

या पार्श्वभूमीवर पीडित महिलांनी पंचायत समिती सदस्य शांताराम कुवर व ग्रामसेवक बी. बी. सूर्यंवंशी यांना दोन दिवसांपूर्वी घेराव घातला. पिण्याच्या पाण्यासंदर्भात काही तरी ठोस निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली. श्री. कुवर यांनी सांगितले, की धसकलपाड्याला जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे. त्यासाठी काही आदिवासींची जमीन लागणार आहे. त्यात विहीर व जलकुंभ उभारला जाईल. यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. नंतर योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकेल. मीना मावळी, भटूबाई देसाई, ताईबाई मावळी, अनिता देसाई, ताराबाई देसाई, रंजीता देसाई, पोसलीबाई वळवी, शांती देसाई, जामनाबाई देसाई, वसंत देसाई, सुनिल देसाई, विजय देसाई, बालू वळवी, वार्सा येथील सामाजिक कार्यकर्ते काकाजी द्यानेश, मिराजी माळी, दानियल कुवर, विजय द्यानेश उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com