धुळे टुडे १ साठी मेन...
---
फोटो- NSK26H33279, NSK26H33280
धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभेला उपस्थित सभापती लताबाई पोतदार, करुणा डहाळे, हेमंत निकम. दुसऱ्या छायाचित्रात बोलतांना सदस्य अमोल मासुळे.
---
भुयारी गटारचे दोन वर्षात फक्त २५ टक्के काम
---
‘स्थायी’त सत्ताधाऱ्यांकडून संतापासह ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; बालवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : ‘अमृत-२.०’ अभियानांतर्गत धुळे शहर मलनिस्सारण योजना (भुयारी गटार) टप्पा-२ चे काम गेल्या दोन वर्षात केवळ २५ टक्केच झाल्याची माहिती स्थायी समितीसमोर आली. या अत्यंत मंदगतीने सुरू असलेल्या कामासह योजनेचे काम निकृष्ट, असमाधानकार व चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचे म्हणत स्थायी समितीच्या सत्ताधारी सदस्यांनी संताप व्यक्त केला. मात्र, या संतापानंतरही ठेकेदाराला कामासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. २२) सकाळी अकराला महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाली. सभापती लताबाई पोतदार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त तथा नगरसचिव हेमंत निकम, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत-२.० अभियानांतर्गत धुळे शहर मलनिस्सारण योजना (टप्पा- २) कामास ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा विषय समितीपुढे होता. या विषयाच्या अनुषंगाने शहर अभियंत्यांनी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. योजनेच्या कामाची मुदत २४ महिने अर्थात १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत होती. या दोन वर्षात योजनेचे केवळ २५ टक्के काम झाल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत ठेकेदाराला ८८ कोटी रुपये अदा झाले असून, ७० कोटी रुपये देयक प्रलंबित आहे. योजनेसाठी मनपा हिस्सा २१४ कोटी रुपये असून, यासाठी महापालिकेने १५० कोटी रुपये कर्ज घेण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. मात्र, अद्याप कर्ज मंजूर झालेले नसल्याचे शहर अभियंता चंद्रकांत उगले यांनी सांगितले.
सदस्यांचा संताप
भुयारी गटार योजनेचे गेल्या दोन वर्षात केवळ २५ टक्केच काम झाल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य अमोल मासुळे, वंदना भामरे यांनी संताप व्यक्त केला. श्री. मासुळे यांनी २०२७ पर्यंत योजना पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, हे कसे होईल. ठेकेदाराकडे मनुष्यबळ पुरेसे नाही. योजनेचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे याप्रश्नी आयुक्तांकडे बैठक लावा, अशी सूचना केली. श्रीमती भामरे यांनी योजनेचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. चेंबरच्या कामांसाठी कच्च्या विटा वापरल्या जात असल्याने चेंबर खचल्याचे म्हणत संताप व्यक्त केला. याबाबत अधिकाऱ्यांनी स्पॉट व्हीजीट करावी, नव्याने काम करावे, अशी मागणीही त्यांनी केली. प्रारंभी मुदतवाढीला त्यांनी विरोध दर्शविला. नंतर मात्र त्यांचा विरोध मावळल्याचे पाहायला मिळाले.
मानधनात वाढ
बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यास समितीने मंजूरी दिली. त्यामुळे आता नऊ बालवाडी शिक्षिकांचे मानधन दहा हजारावरुन १३ हजार तर दोन मदतनीसांना सात हजारावरुन साडेसात हजार मानधन मिळणार आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी (आयुष) योगेश पाटील यांचेही मानधन ४० हजारावरुन ६० हजार रुपये करण्यास मंजूरी देण्यात आली.
स्पर्धेसाठी सव्वाआठ लाख
धुळे मनपा स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा-२०२६-२७ साठी आठ लाख २५ हजार रुपये निधी देण्यासही मंजूरी देण्यात आली. या विषयावर बोलतांना सदस्या श्रीमती भामरे यांनी आमच्या कामांसाठी ठेकेदाराची छोटी-छोटी बिले निघत नाहीत, असे म्हणत क्रीडा स्पर्धेत आठ लाख कशावर खर्च होणार त्याची माहिती द्यावी अशी मागणी केली.
रस्ता स्थलांतराचा विषय मंजूर
मौजे देवपूर नेहरु हौसिंग सोसायटीतील सं.न. २८/अ सि. स.नं. ८९७६ व ८९८३ मधील सहा मीटर रस्ता स्थलांतर करुन दोन्ही सि. स. नं. एकत्र करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या यांनी यासाठी अर्ज केला होता.
---
...चौकट...
नगरसचिव पद मानधनावर
महापालिकेतील नगरसचिव पद मानधन तत्वावर भरण्यासाठीचा विषयही स्थायी समितीने मंजूर केला. या पदासाठी महापालिकेने गुरुवारी (ता.२२) जाहिरातदेखील प्रसिद्ध केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ ला तत्कालिन नगरसचिव मनोज वाघ निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त आहे.
---