KPD26B13608
धुळे : महिला बचत गटाच्या प्रदर्शनातील स्टाॅल.
-----
धुळ्यात महिला बचतगटांचे फराळ प्रदर्शन
आमदार राम भदाणे यांच्या संकल्पनेतून स्वदेशी प्रदर्शन, खरेदीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ८ : धुळे शहरातील नेताजी मैदानावर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्यासाठी स्वदेशी वस्तू फराळ विक्री प्रदर्शनाचा प्रारंभ झाला आहे. उमेद संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या वस्तू आणि दिवाळी फराळ व स्वदेशी खरेदी करण्याचे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले आहे.
आमदार भदाणे यांच्या संकल्पनेतून हा स्वदेशी उपक्रम साकार झाला आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांचे प्रदर्शनाला मार्गदर्शन लाभत आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील सुमारे ४० बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला आहे. महिलांनी चकली, शेव, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे, तसेच विविध गृहउपयोगी वस्तू, लोणची, पापड, मसाले, हस्तकला वस्तू, आकाशकंदील, पणत्या आणि इतर आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.
स्वदेशी बाजारपेठ
घरच्या घरी व्यवसाय करणाऱ्या या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी. योग्य भाव मिळावा आणि दिवाळीत त्यांच्या घरातही आनंदाचे दिवे लागावेत, हाच या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे. दुष्काळी परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या महिलांच्या कष्टाला आणि कौशल्याला धुळेकरांनी दाद द्यावी, असे आवाहन आमदार भदाणे यांनी केले आहे.