द्याने भागात एकाची
गळफास घेत आत्महत्या
मालेगाव : येथील द्याने भागातील अशोक बाबुलाल जगधान (वय ४३, रा. बहुजन नगर) यांनी राहते घराच्या छताच्या लाकडी बल्लीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाईक राजकिशोर जगधान यांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. आलीम यांनी तपासून मयत घोषित केले. २६ ऑक्टोबरला पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला. द्याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
-----
शारदा नगरात
वाळू जप्त
मालेगाव : येथील कॅम्प भागातील शरदानगरात डंपरमधून साडेपाच ब्रास वाळू जप्त केली. पोलिसांनी नाना बाजीराव माखणे (वय ४०, रा. चोंढी) व संतोष छगन श्रीराम (वय ३२, रा. मनमाड) यांच्या ताब्यातून ४५ लाखाचा डंपर (एमएच १८ सीएम ८६८७) व डंपरमधील ३५ हजार ५०० रुपयांची साडेपाच ब्रास वाळू असा एकूण ४५ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----
गुलशेरनगरात
एकास मारहाण
मालेगाव : येथील गुलशेरनगर भागात बकरी धुतल्याचे पाणी अंगणात आल्याने एकास जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला. आसिफ खान अलीयार खान (रा. गुलशेरनगर) हे त्यांच्या घरासमोर बकरीला धुवत होते. बकरी धुतल्याचे पाणी शोएब (पुर्ण नाव माहित नाही, रा. गुलशेरनगर डेपो) याच्या अंगणात गेले. या कारणावरुन कुरापत काढून शोएब, सोनू, गयासोद्दीन उर्फ राजू, अश्पाक (पुर्ण नावे माहित नाही) यांनी आसिफ खान यांना मारहाण केली. तसेच काहीतरी धारदार हत्याराने वार करुन डोक्याला दुखापत केली. २६ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.