फोटो : H31885
पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : येथील प्रसिद्ध पक्षीमित्र, निसर्ग अभ्यासक आणि लेखक दिगंबर गाडगीळ (वय ९१) यांचे शनिवारी (ता. १०) सकाळी सातला वृद्धापकाळाने निधन झाले. पर्वती (पुणे) येथे ते निवासी होते. त्यांच्या मागे दोन भाऊ, पुतणे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
दिगंबर गाडगीळ यांनी चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रात पक्षी निरीक्षण, पक्षीसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे. ‘पक्षीगाथा’ यांसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून पक्ष्यांच्या जगण्याची व विविध बारीकसारीक गोष्टींची रंजक माहिती त्यांनी मांडली. गाडगीळ यांना महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे प्रतिष्ठित ‘पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार’ (२०२३) प्रदान करण्यात आला होता. त्यांनी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ या त्रैमासिकाचे संपादनही केले आहे.
२८ जानेवारी १९३५ रोजी जन्मलेल्या गाडगीळ यांनी पक्ष्यांचा अभ्यास, पक्षीसंवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी दीर्घकाळ योगदान दिले. १९८१ मध्ये नाशिकच्या पक्षिमित्र मंडळाचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८६ मध्ये नाशिक येथे झालेल्या सहाव्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९९४ ते २००० या काळात त्यांनी महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे संघटक आणि उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. २००४ मध्ये नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या पक्षिमित्र चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.