एन्कर
फोटो : H31858
पक्षी, विज्ञान अन् संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारे दिगंबर गाडगीळ
लीड
पक्ष्यांविषयीचे प्रेम समाजापर्यंत पोहोचवताना पर्यावरणाची जाणीव जागवणारे आणि त्याच वेळी वाचन, विज्ञान व चित्रपटसंस्कृतीच्या क्षेत्रांत सक्रिय राहणारे पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम त्यांच्या व्यापक आवडींची आणि सातत्यपूर्ण सामाजिक सहभागाची साक्ष देते. ‘पक्षिमित्र’ ही त्यांची ओळख त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होती; मात्र त्या ओळखीभोवती ग्रंथालय चळवळ, विज्ञानप्रसार, चित्रपट चळवळ आणि संपादन अशा अनेक क्षेत्रांचे समृद्ध वर्तुळ विस्तारलेले होते.
--
२८ जानेवारी १९३५ रोजी जन्मलेल्या गाडगीळ यांनी विज्ञान शाखेची पदवी आणि विमा क्षेत्रातील ‘एएफआयआय’ ही पात्रता प्राप्त केली होती. विज्ञानाची पार्श्वभूमी, भाषेची जाण आणि व्यवस्थापनाचा अनुभव यांचा संगम त्यांच्या पुढील कामात दिसतो. १९५६- ५७ या काळात त्यांनी ‘अमृत’ मासिकात उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर १९५८ ते १९९३ अशी प्रदीर्घ कारकीर्द भारतीय आयुर्विमा महामंडळात घालवली. तेथून निवृत्त होताना ते विभागीय अधिकारी होते. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी सामाजिक कामासाठीही वेळ दिला. त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात तरुण वयातच झाली होती. चित्रपटांकडेही त्यांनी सांस्कृतिक जाणिवेने पाहिले. १९७९ मध्ये नाशिकच्या दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी म्हणून ते कार्यरत झाले. त्यांच्या योगदानाबद्दल २००४ मध्ये वेस्टर्न झोन फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजच्या पायोनिअर सन्मानाने गौरवले गेले. दिगंबर गाडगीळ यांना २०२४ चा महाराष्ट्र पक्षिमित्र जिवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. पक्षी आणि पर्यावरण या क्षेत्रात गाडगीळ यांचे काम अधिक व्यापक झाले. १९८१ मध्ये नाशिकच्या पक्षिमित्र मंडळाचे संस्थापक सेक्रेटरी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. १९८६ मध्ये नाशिक येथे झालेल्या सहाव्या पक्षिमित्र संमेलनाचे ते आयोजक होते. पुढे १९९४ ते २००० या काळात महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेत संघटक आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. २००४ मध्ये नांदेड येथे झालेल्या एकविसाव्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. पक्ष्यांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्या पर्यावरणरक्षक भूमिकेविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी विविध माध्यमांचा वापर केला. ‘पक्षी पर्यावरण रक्षी’ या विषयावर त्यांनी सुमारे साठ स्लाइड शो केले. वृत्तपत्रांतील लेखन आणि आकाशवाणीवरील व्याख्याने यांमधूनही त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. २०१० पासून ‘पक्षिमित्र’ त्रैमासिकाच्या संपादनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. त्यांच्या परिचयपत्रात पाच पुस्तके प्रकाशित झाल्याची नोंदही आहे. विज्ञानप्रसार आणि इतर सामाजिक संस्थांशीही त्यांचा सक्रिय संबंध होता. १९९३ ते २०१८ या काळात ते सायन्स फिचर्सचे संचालक होते. १९९० ते १९९४ या काळात नाशिकच्या राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २००० पासून महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या कार्यकारी सदस्यपदाची जबाबदारीही स्वीकारली होती. या विविध भूमिकांकडे एकत्रितपणे पाहिले, तर त्यांच्या कामाची व्याप्ती जाणवते. त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनी घेतली. चित्रपट चळवळीतील सन्मानाबरोबरच २००६ मध्ये महापालिकेचा लोककल्याण पुरस्कार आणि २०१० मध्ये किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार त्यांना मिळाला. हे सन्मान त्यांच्या कार्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणविषयक पैलूंना मिळालेली पावती म्हणता येतील. मात्र त्यांच्या वाटचालीचे खरे महत्त्व दीर्घकाळ टिकलेल्या कार्यनिष्ठेत आहे. गाडगीळ यांच्या निधनाने पक्षिमित्र चळवळीतील एक अनुभवी कार्यकर्ता आणि नाशिकच्या सार्वजनिक जीवनातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. अनेक क्षेत्रांना जोडणाऱ्या या निष्ठावंत कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
- डॉ. अनिल माळी,
पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार