डिजिटल बिलबोर्डच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूक
गंगापूर पोलिसात पाच संशयितांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : शहरात डिजिटल बिलबोर्ड, टू-डी व थ्री-डी स्क्रीन जाहिरात फलक आणि एलईडी जाहिरात प्रणालीच्या व्यवसायाची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३७ लाख १७ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश ज्ञानेश्वर पाटील (३७, रा. खुटवडनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सोमनाथ तानाजी जाधव, रूपाली सोमनाथ जाधव (दोन्ही रा. सातारा), पंकज कुमार, विजय निकम आणि धनंजय तिवारी यांनी परस्पर संगनमत करून हा कट रचला. संशयितांची नवी मुंबई येथील पनवेल येथे इनोदय एएम टेक प्रा. लि. नावाची कंपनी असून, ते सॉफ्टवेअर तयार करणे तसेच राज्यभरात थ्री-डी डिजिटल बिलबोर्डद्वारे जाहिराती करण्याचे काम करतात. पाटील यांना नाशिकमध्ये या व्यवसायाचे फ्रँचायझी देण्याचे आमिष संशयितांनी दाखवले. गुंतवणुकीवर ५ टक्के नफा मिळवून देण्याचे तसेच व्यवसाय न झाल्यास संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन देत संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानुसार, गंगापूर रोडवरील केबीटी सर्कल परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करण्यात आली. पाटील यांनी आपल्या व कुटुंबीयांच्या बँक खात्यावरून तसेच वेळोवेळी रोख स्वरूपात असे मिळून एकूण ३७ लाख १७ हजार ६५० रुपये संशयितांना दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे डिजिटल बिलबोर्ड व व्यवसाय सुरू न करता संशयितांनी परवानग्या प्रलंबित असल्याचे, साहित्य नसल्याचे किंवा तांत्रिक कारणे पुढे करून उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार दिली. सदर प्रकार जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान घडला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद पाटील करीत आहेत.