एस.टी.च्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेला डिजिटल गती
घरबसल्या मोबाईलवरच मिळणार पास; रांगांतून सुटका
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ३ : बस प्रवास करून पर्यटनाच्या माध्यमातून नियमित भ्रमंती करणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आणखी एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. एस. टी. महामंडळाची अत्यंत लोकप्रिय असणारी ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास पास’ ही योजना आता पूर्णपणे डिजिटल झाली असून, प्रवाशांना हे पास थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बसस्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोरील लांबलचक रांगा आणि कागदी पासेसची समस्या निकाली निघणार आहे.
यापूर्वी हे पासेस आगारांमधून केवळ हस्तलिखित पद्धतीने वितरित केले जात होते. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि सेवेत पारदर्शकता यावी यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. या पोर्टलवरून प्रवासी ४ दिवस आणि ७ दिवसांचे पासेस घरबसल्या काही मिनिटांत काढू शकतात. ऑनलाईन घेतलेला पास कागदावर प्रिंट स्वरूपात किंवा थेट मोबाईलमधील पीडीएफ (PDF) स्वरूपात दाखवला तरी तो प्रवासासाठी वैध धरला जाईल. प्रवासादरम्यान वाहक (कंडक्टर) त्यांच्या ईटीआय (ETI) मशीनद्वारे पासवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची पडताळणी करतील.
ओळखपत्र बाळगणे बंधनकारक
ऑनलाईन पासधारक प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वतःचे मूळ वैध ओळखपत्र- आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा डिजीलॉकरमधील (DigiLocker) डिजिटल ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. प्रवासादरम्यान क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास किंवा कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाने ०८०६५९०३२७२ आणि ०८०६५९०३२७३ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.
-------
प्रवाशांचा वेळ वाचवणारी आणि आधुनिक प्रवासाला दिशा देणारी ही नवी प्रणाली आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील पर्यटकांना आणि नियमित प्रवाशांना आता आगारात चकरा मारण्याची गरज उरणार नाही. प्रवाशांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
- महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक
---------
तांत्रिकदृष्ट्या ही प्रणाली अत्यंत सुरक्षित आणि सुटसुटीत आहे. वाहकांच्या हातातील ईटीआय मशीनवर थेट क्यूआर कोड स्कॅन होणार असल्याने पडताळणी झटपट होईल आणि बनावट पासेसना आळा बसेल. प्रवाशांनी प्रवासात केवळ वैध ओळखपत्र जवळ ठेवावे, जेणेकरून तपासणीदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.
- मनोज पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक