

Four suspects arrested in Dindori armed robbery case.
esakal
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील गणोरवाडी शिवारात शेतवस्तीवरील घरात घुसून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन बंदुका, जिवंत काडतुसे, चॉपर तसेच गुन्ह्यात वापरलेली आणि चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीतील अन्य दोन संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
गणोरवाडी शिवारातील शेतगट क्रमांक ६४ येथे राहणारे संजय भास्कर पिंगळे यांच्या घरावर २ नोव्हेंबरला रात्री सुमारे पावणेदोनच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला केला होता. घटनेच्या वेळी संजय पिंगळे आणि त्यांची पत्नी असे दोघेच घरात होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून दाम्पत्याला बंदूक, चाकू, तलवार आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील रोख एक लाख ३० हजार रुपये, सोन्याचे दागिने, साडेतीनशे भार चांदीचे दागिने तसेच घरातील मोटारसायकल असा सात लाख दहा हजाराचा मुद्देमाल लुटून नेला होता.
या घटनेनंतर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व आर्म्स ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली.