VNI26B13296
दिंडोरी : दिंडोरी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना ई- शिधापत्रिकांचे वितरण करताना तहसीलदार मुकेश कांबळे, पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर, दिव्यांग साधना संघाचे पदाधिकारी व लाभार्थी.
------------------
दिव्यांग लाभार्थ्यांना
ई- शिधापत्रिका वितरण
---------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१५ : दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत दिंडोरी तहसील कार्यालयात विशेष शिबिर घेण्यात आले. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देत ई-शिधापत्रिकांचे वितरण तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ई- शिधापत्रिकांमुळे लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेणे तसेच शिधापत्रिकेशी संबंधित माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणे सुलभ होणार आहे. शासकीय योजनांची माहिती, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी सांगितले.
दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांच्यासाठी सुविधा सुलभ करण्याच्या दृष्टीने सेवा संकल्प अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे दिव्यांग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी नमूद केले. तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर, दिव्यांग साधना संघाचे तालुकाध्यक्ष दीपक भोये, सचिव संतोष रोकडे, कांचन गांगुर्डे, जयंत लहरे, बापू घोडेस्वार, गोकूळ गांगुर्डे, सुनीता पवार यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
----------------