पान तीन
-------------
13208
दिंडोरी : डोक्यावर वाळलेले पिकांचे पेंढे घेवून आंदोलन करताना पदाधिकारी.
दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा;
पेंढे हातात घेत शेतकऱ्यांचा ठिय्या; आमरण उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १४ : पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिंडोरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वाळलेले भात, वरई आणि सोयाबीन पिकांचे पेंढे हातावर व डोक्यावर घेऊन अनोख्या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले. पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौफिक मणियार आणि संतोष रेहरे यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिंडोरी तालुक्यातील सुमारे ८० टक्के भागात मुसळधार पावसामुळे नव्हे तर पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. भात, नागली, वरई, उडीद, मका, सोयाबीन आणि टोमॅटो ही हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात हाताशी आलेले पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा व उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, एवढे मोठे नुकसान होऊनही महसूल विभागाचे कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष पंचनाम्यांसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नसल्याचा गंभीर आरोप या वेळी करण्यात आला. प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. जर या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता झाली नाही, तर आगामी आठ दिवसांत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात श्याम गवारे, गुलाब गायकवाड, योगेश कराड, संदीप भेरे, हिरामण गायकवाड, दशरथ शेखरे, छगन शेखरे, हरी शेखरे, कांतिलाल शेखरे, मुकुंदा शेखरे, माणिक शेखरे, विजय शेखरे, हनुमान शेखरे, काशीनाथ शेखरे, दौलत शेखरे, शंकर गायकवाड, कैलास गायकवाड, मोहन गायकवाड, हिरामण शिंदे, सोनीबाई गायकवाड, जयराम गायकवाड, देवीदास गायकवाड, मोतीराम शेखरे, धनराज माळेकर, विठ्ठल माळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.