फोटो- 13131
दिंडोरी ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सोमवारी नाशिक- वणी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेला रास्ता रोको.
दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको
तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
वणी, दिंडोरी, ता. ५ : तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सोमवारी (ता. ५) दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले.
.........
शेतकऱ्यांना खतांचा मुबलक पुरवठा करावा, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, शेतीसाठी आठ तास अखंडित वीजपुरवठा करावा, वारंवार वीज खंडित होण्याचा प्रश्न सोडवावा, तालुक्यातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी, धरणातील पाणी दिंडोरी तालुक्यासाठी आरक्षित ठेवून कालव्यांची दुरुस्ती करावी, तसेच पाणीयोजना सुरळीत कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. आदिवासी आश्रमशाळांमधील समस्या सोडवाव्यात, वनपट्टे, घरकुल आणि जात दाखल्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. तालुक्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असल्याने दिंडोरीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दुष्काळी मदत, शेतीसाठी वीज, पाण्याचे नियोजन आणि पीक नुकसानीचे प्रश्न मांडले. तालुकानिहाय निकष न लावता गाव व सर्कलनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
सोयाबीन, मका, भाजीपाला, गहू आणि टोमॅटो यांसारख्या पिकांचे नुकसान झाले असून, वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पदंश तसेच विजेच्या धक्क्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुक्यातील एमआयडीसीत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, अशा मागण्याही मांडण्यात आल्या. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज खांदवे, जेष्ठ नेते आबासाहेब देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष तौसिफ मणियार, संतोष रेहरे, अशोक नायकवाडे, गंगाधर निखाडे, संदीप फेरे, रोशन धगे, राहुल उगले, संजय घाडगे, हिरामण खंदवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
....