दिंडोरीत ८०० कोटींची कामे झाली कशी
आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांचा माजी मंत्र्यांना प्रतिप्रश्न
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी असलेल्या वादातून आदिवासी विकास विभागातील ठेकेदारांची १० हजार कोटी रुपयांची बिले अडविण्यात आल्याचा आरोप आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वी एकट्या दिंडोरी मतदारसंघात ८०० कोटींची कामे झाली कशी, असा प्रतिप्रश्न उपस्थित करत त्यांची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
आदिवासी विकास विभागाचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या मतदारसंघात रस्त्यांसाठी निधी दिला नाही म्हणून विद्यमान मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी ठेकेदारांचे तब्बल दहा हजार कोटी रुपयांची रक्कम अडवल्याचा गंभीर आरोप ठेकेदारांनी मंगळवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत केला. आजी-माजी मंत्र्यांमधील सुप्त संघर्षामुळे एकट्या नाशिक विभागाचे सात हजार कोटी रुपये थकीत असून, डॉ. उईके आणि सचिवांनी दोन वर्षांपासून एक रुपयाचाही मोबदला दिला नसल्याचा गंभीर आरोप करताना आदिवासीमंत्र्यांच्या अन्यायाविरोधात येत्या ७ डिसेंबरपासून नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनासह बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती असोशिएशनने दिली आहे. त्याला आता डॉ. उईके यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. उईके म्हणाले, सुमारे १९ हजार कामे मंजूर झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ५०० कामेही पूर्ण झाली नसतील, असा गंभीर दावा त्यांनी केला. ज्या ठिकाणी कामांना मंजुरी देण्यात आली, त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम झालेले नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. आदिवासी विभागाने रस्त्यांसाठी निधी दिला असताना काही ठिकाणी पूल बांधण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. कामांच्या स्वरूपात बदल कसा झाला, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र ॲपमार्फत कामांची तपासणी
यापूर्वी मंजूर व पूर्ण झालेल्या कामांची पडताळणी करण्यासाठी विभागाने स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ठेकेदारांनी प्रत्यक्षात काम केले असेल, तर संबंधित अभियंत्यांनी त्या कामांचे फोटो ॲपवर अपलोड करावे. कामांची पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना तत्काळ पैसे दिले जातील, असे डॉ. उईके यांनी स्पष्ट केले. मात्र, काम न करता बिलांची मागणी केली जात असेल, तर ती मान्य केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.