पान चार ॲंकर
--------------
31486
नाशिक : इस्कॉन युथ सर्व्हिसेसतर्फे आयोजित ‘डिस्कव्हर युअर सेल्फ’ कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी भाविकांची उपस्थिती
भविष्याच्या चिंतेतून ‘स्व’चा शोध
‘डिस्कव्हर युअर सेल्फ’ कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.६ : भविष्यातील चिंता, अतिविचार, अभ्यासाचा ताण, एकाग्रतेचा अभाव आणि वर्तमानात जगण्यातील अडचणी या प्रश्नांवर संवाद साधत इस्कॉन युथ सर्व्हिसेसतर्फे आयोजित ‘डिस्कव्हर युअर सेल्फ’ कार्यशाळेत १५ ते ३० वयोगटातील सुमारे १०० तरुणींनी सहभाग घेतला.
१ ते ४ ऑक्टोबरदरम्यान द्वारका येथील इस्कॉन श्री श्री राधा मदनगोपाल मंदिरात चार दिवसांत विविध सत्रांद्वारे आत्मपरीक्षण आणि जीवनदृष्टीवर चर्चा करण्यात आली. ‘मी कोण आहे?’, ‘शाश्वत आनंदाचा शोध’, ‘भगवान आहेत का?’ तसेच ‘भगवान एक आहेत की अनेक?’ या मूलभूत प्रश्नांसोबतच अभ्यास, करिअर, मानसिक ताण आणि भविष्याबाबतचा संभ्रम यावरही संवाद साधण्यात आला. सादरीकरणे, माहितीपट आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विषय मांडण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी तरुणींशी संवाद साधताना भविष्यात काय होईल, या विचारात वर्तमानातील अभ्यास आणि दैनंदिन जीवनाकडे लक्ष केंद्रित करता न येणे ही समस्या प्रकर्षाने समोर आली. मनाला योग्य दिशा देणे, दैनंदिन सवयी तपासणे आणि सकारात्मक संगत ठेवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. हरे कृष्णा महामंत्राचा जप, आहाराकडे लक्ष आणि आत्मपरीक्षण यावरही भर देण्यात आला.
मुख्य मार्गदर्शक रासराधिका माताजी राधिका पाटील यांनी सांगितले की, वैदिक विचार केवळ धार्मिक चौकटीत न मांडता मानसिक ताण, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांच्याशी जोडून घ्यावे. इस्कॉन युथ सर्व्हिसेसतर्फे वर्षभर अनाथाश्रम भेट, गोसेवा, योग शिबिरे, आहार मार्गदर्शन, रक्तदान, गोदावरी स्वच्छता अभियान आणि पुस्तक वितरण यांसारखे उपक्रमही राबविले जातात. ‘चेतना फेस्टिव्हल’मधूनही तरुणींना आध्यात्मिक मूल्ये, जीवनदृष्टी आणि सेवाभावाचे मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेनंतर ‘ॲडव्हान्स्ड डिस्कव्हर युअर सेल्फ’ कोर्स दर रविवारी सकाळी अकराला मंदिरात होणार आहे.