नाशिकचे नेमके जिल्हाधिकारी कोण? एक किस्सा अन् कमालीची चर्चा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

नाशिकचे नेमके जिल्हाधिकारी कोण? एका पदाबाबत कमालीची चर्चा!

सिडको (नाशिक) : काही दिवसांपासून नाशिक (nashik) शहरात एका पदाबाबत (designation) कमालीची चर्चा ऐकायला मिळत आहे आणि ती म्हणजे ‘जिल्हाधिकारी’ या पदाची....याबाबत एक किस्सा चांगलाच प्रसिध्द आहे....

किस्सा जिल्हाधिकारी पदाचा...

एके दिवशी नाशिक युवासेनेचे (nashik yuvasena) जिल्हाधिकारी असलेले दीपक दातीर (deepak datir) नाशिकचे जिल्हाधिकारी यांना काही कामानिमित्त भेटण्यासाठी गेले. त्यावेळी दीपक दातीर यांनी तेथील शिपायाला व्हीजिटिंग कार्ड दिले. शिपायाने ते कार्ड जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले. जिल्हाधिकारी ते व्हिजिटिंग कार्ड पाहून अवाकच झाले. त्यांना भेटण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी शिपायाला बेल मारत, ‘या महोदयांना लवकर आत पाठवा, म्हणून फर्मान सोडले’. एवढी मोठी रांग असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला प्रथम प्राधान्य दिले. त्याचा आनंद दातीर यांना झाला. दातीर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करताच जिल्हाधिकाऱ्यांनी ‘या- या जिल्हाधिकारी महोदय’ अशाप्रकारे स्वागत करून त्यांना स्वतःच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांचा स्वागताचा हा प्रकार बघून दातीर मात्र काही वेळासाठी खजील झाले.

हेही वाचा: निर्बंध शिथिल होताच नाशिककरांसाठी चिंता वाढविणारी बातमी!

शिवसेनेतील 'त्या' पदांना अनन्यसाधारण महत्त्व

एकेकाळी शिवसेनेतील पदांना अनन्यसाधारण महत्त्व होते. जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुखपद दूरची गोष्ट होती. साध्या शाखा प्रमुखपदालाही एखाद्या नगरसेवक अथवा आमदाराइतके महत्त्व होते. त्यामुळे शिवसैनिक व जनतेत जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख व शाखाप्रमुख ही पदे आदरयुक्त भीतीचे होती. शिवसेना संलग्नित युवासेनेमधील एक पद कमालीचे चर्चेत आहे आणि ते म्हणजे जिल्हाधिकारी. युवासेनेची जिल्ह्यात जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारीपद बहाल करण्यात आले आहे. त्यानंतरची उपजिल्हाधिकारी, विस्ताराधिकारी, विभागीय अधिकारी, सचिव अशी पदे देण्यात आली आहे. मात्र, ही सर्व पदे प्रशासकीय कार्यालयांमध्ये बघतो. मात्र, युवासेनेच्या या पदांमुळे कधी कधी तो चेष्टेचा विषयही बनू पाहत आहे. त्यामुळे हे पद समोरच्याला सांगायचे की नाही, असा प्रश्न युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना पडतो. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, महानगरप्रमुख या पदांना असलेले वजन युवासेनेच्या पदांमध्ये दिसून येत नसल्याचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळे ही सर्व पदे शिवसैनिक व जनतेसाठी चर्चेचा विषय बनू पाहत आहेत. हे वरिष्ठांना सांगणार कोण, असा प्रश्न पदाधिकारी कधी कधी उपस्थित करताना दिसतात. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई शनिवारी (ता. ७) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. निदान ते तरी याची दखल घेऊन पदांची पुननिर्मिती करतील, अशी अपेक्षा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल, तर त्यात वावगे काय?

हेही वाचा: पाकिस्तानचा कांदा श्रीलंकामध्ये भारतापेक्षा स्वस्त!