जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
---
एकाही उमेदवाराची माघार नाही
---
१८ जागांसाठी ३०९ उमेदवार रिंगणात; - माघारीसाठी १७ पर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तीन उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर आता १८ संचालकपदासाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी (ता. ४) एकाही उमेदवाराने माघारी घेतली नाही. माघारीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप होईल. कोण कोण उमेदवार माघार घेतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
दाखल ४०२ उमेदवारी अर्जापैकी छाननीत तब्बल ९३ अर्ज बाद झाल्याने आता ३०९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोर आव्हान कायम आहे. अर्ज छाननीत संचालकपदाच्या दहा वर्षांच्या अटीमुळे चेअरमन संजय पवार, आमदार अनिल पाटील यांचा, तर विविध कारणांमुळे पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचे अर्ज बाद झाले आहेत.
मुक्ताईनगर मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, देवयानी चंद्रकांत देशमुख, विनोद तराळ, एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्यासह चार उमेदवार रिंगणात आहेत.
राखीव प्रवर्गातही मोठी चुरस
इतर मागासवर्ग प्रवर्गात सर्वाधिक ५३ अर्ज वैध ठरले आहेत. यात मावळते संचालक डॉ. सतीश पाटील, प्रताप पाटील, उदय पाटील, राजेश पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, माधुरी अत्तरदे आणि विष्णू भंगाळे यांचा समावेश आहे. इतर सहकारी संस्था मतदारसंघात विशाल देवकर, गोपाल भंगाळे, प्रताप पाटील, पूनम पाटील आणि दूध संघाचे संचालक रमेश पाटील यांच्यासह ४५ उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी मतदारसंघात जळगावच्या नगरसेविका वैशाली पाटील, तिलोत्तमा पाटील, रेखा पाटील, इंदिराताई पाटील, जनाबाई महाजन, वैशाली पंढरीनाथ पाटील, पी. सी. पाटील, धनश्री देवकर आणि कल्पिता पाटील यांच्यासह ४२ उमेदवार रिंगणात आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात मावळते संचालक मेहताबसिंग नाईक आणि माजी महापौर सदाशिव ढेकळे यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात आमदार चंद्रकांत सोनवणे, मावळते संचालक श्यामकांत सोनवणे आणि प्रभाकर सोनवणे यांच्यासह आठ उमेदवार रिंगणात आहेत. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि भाजप पदाधिकारी तुकाराम निकम यांचे अर्ज कायम आहेत. निकम महाजनांचे समर्थक मानले जातात. दोघांपैकी एकाची माघार होण्याची शक्यता आहे. चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण, मावळते संचालक प्रदीप देशमुख यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यमान संचालिका जयश्री महाजन, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, प्रभाकर सोनवणे रिंगणात आहेत. रावेरमध्ये आमदार नंदकिशोर महाजन,राजेश वानखेडे आणि गोंडू महाजन यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात आहेत. चोपडा मतदारसंघात रोहित निकम, मावळते संचालक घनश्याम अग्रवाल यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
यावलमध्ये मावळते संचालक विनोद पाटील आणि प्रशांत चौधरी यांच्यासह सहा उमेदवार रिंगणात आहेत. धरणगाव मतदारसंघात पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप गुलाबराव पाटील, बंकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी- सोनल पवार, पूत्र-संग्रामराजे संजय पवार, भाजपचे गायत्री भगवान पाटील रिंगणात आहेत. अमळनेरमध्ये माजी आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, प्रफुल्ल हिरालाल पवार रिंगणात आहेत. भडगावमध्ये चार, तर बोदवडमध्ये तीन उमेदवार रिंगणात आहे.
बिनविरोध झालेले उमेदवार
माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी पाटील, आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील, तर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाचोरा मतदारसंघात भाजपचे सतीश परशुराम शिंदे हेही एकमेव उमेदवार आहेत.