‘स्वर सावाना’ने जिल्हा साहित्यिक संमेलनाची नांदी
---
आज ग्रंथदिंडी; राजू बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : तिलक कमोद, यमन, किरवाणी, मालकंस, वाचस्पदी, अहिर भैरव, पूरिया धनश्री यांसारख्या अनेक रागदारीवर आधारित ‘रागरंग’ मैफलीतून नानाविध रागांची उधळण करण्यात आली. सार्वजनिक वाचनालय आयोजित ५७ व्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाची सुरुवात ‘स्वर सावाना’ उपक्रमाने शुक्रवारी (ता. १६) करण्यात आली. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात कार्यक्रम झाला. उपक्रमाचे २७ वे पुष्प होते. अमोल पाळेकर यांचे वाद्यवृंद संयोजन होते; तर प्रा. आनंद अत्रे, मधुरा बेळे, प्राजक्ता अत्रे-गोसावी, प्रांजली बिरारी यांनी ‘गगन सदन तेजोमय...’, ‘या चिमण्यांनो...’, ‘ऋतू हिरवा...’, ‘श्रावणात घन निळा बरसला...’, ‘भावनांचा तू भुकेला रे...’, ‘दाटून कंठ येतो...’ यांसारखी अनेक लोकप्रिय हिंदी-मराठी गाणी सादर केली. स्वर सावानाप्रमुख प्रशांत जुन्नरे यांनी रसिकांचे स्वागत केले. गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बर्वे यांनी आभार मानले.
फोटो : B61108,09
जिल्हा साहित्यिक संमेलनाचे आज उद्घाटन
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे निवास्थान ते सावाना आवारात सकाळी सातला ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यानंतर ‘मविप्र’ सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सायंकाळी पाचला साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त राजू बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, ज्येष्ठ कवी राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल.