जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाची शुक्रवारपासून नांदी
सार्वजनिक वाचनालयात सलग चार दिवस कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : सार्वजनिक वाचनालय आयोजित ५७वे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. त्याची नांदी येत्या शुक्रवारी ‘स्वर सावाना’ या उपक्रमाने होणार असून सायंकाळी सहाला अमोल पाळेकर प्रस्तुत ‘रागरंग’ विविध रागांवर आधारित हिंदी-मराठी गाणी सादर केली जाणार आहेत.
संमेलनाची सुरवात शनिवारी (ता. १७) सकाळी सातला कविवर्य कुसुमाग्रज यांचे निवासस्थान ते सावाना परिसरापर्यंत ग्रंथदिंडीने हाेणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजू बाविस्कर यांच्या हस्ते सायंकाळी पाचला संमेलनाचे उद्घाटन होईल. ५६व्या संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. बी.जी. शेखर नूतन अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर यांना पदक प्रदान करून संमेलनाची सूत्र सुपूर्द करतील. त्यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. रविवारी (ता. १८) सकाळी साडेदहाला अध्यक्ष प्रकाश होळकर ‘समकालीन साहित्य’ विषयावर आपले अध्यक्षीय मनाेगत मांडतील. त्यानंतर सकाळी साडे अकराला ‘अनुवादित साहित्य’ विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये अपर्णा वेलणकर व प्रा सतीश श्रीवास्तव सहभागी होतील तर, वंदना अत्रे समन्वयक असतील. दुपारी दोनला पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सत्कार समारंभ व लेखिका रेखा भांडारे यांच्या ‘संवाद : नरहर कुरूंदकरांशी’ व ‘इंदिरा संत : एक अपूर्व ऋणानुबंध’ पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. दुपारी साडे तीनला लेखकांचे मनोगत होणार आहे. सोमवारी (ता. १९) ‘स्मृतींच्या काव्य वाटा’ गायन, नृत्य व नाट्याविष्कार कार्यक्रमाने संमेलनाचा समाराेप हाेईल. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी पाचला कार्यक्रम होईल. संहिता कवी राजू देसले यांची तर दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे आहे. नाशिककरांना परिचित असलेला जिल्हा साहित्यिक मेळाव्याला मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त झाल्याने ‘मेळाव्याच्या’ ऐवजी आता ‘संमेलन’ असा बदल करण्यात आला आहे.
------