फोटो : NSK26H33460
नंदुरबार : येथील यशवंत विद्यालयाच्या मैदानात आयोजित शिबीरात ज्येष्ठ नागरीकांची तपासणी करताना. समवेत आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, राम रघुवंशी, बी.के.पाटील, कुणाल वसावे आदी.
--------------
नंदुरबारला प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राला मंजुरी
आमदार रघुवंशी यांचा पाठपुरावा; ज्येष्ठ नागरिक- दिव्यांगांना मिळणार मोफत साहित्य
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २४ : केंद्र सरकारने नंदुरबारमध्ये प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आरोग्य तपासणीसह आवश्यक सहाय्यकारी उपकरणे मोफत उपलब्ध होणार आहेत. शहरातील जयप्रकाश नारायण रुग्णालयात दिव्याशा केंद्र सुरू होणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यकारी साहित्य उपलब्ध करून दिले जाते. नंदुरबारला हे केंद्र मंजूर झाल्याने जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना आता आवश्यक उपकरणांसाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय वयोश्री योजना, एलिम्को आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १० शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांद्वारे आतापर्यंत सुमारे पाच हजार लाभार्थ्यांना पाच कोटी रुपयांच्या सहाय्यकारी साहित्याचे वाटप केले असून, सीएसआरच्या माध्यमातून देखील गरजूंना साहित्य उपलब्ध करून दिले आहे. दिव्याशा केंद्र मंजूर झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य व सामाजिक कल्याण क्षेत्रात महत्त्वाची भर पडली आहे.
------
शिबिरात ८०० रूग्णांची तपासणी
दरम्यान, शनिवारी यशवंत विद्यालयाच्या मैदानात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रीय वयोश्री योजना, एलिम्को आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे घेण्यात आले. यात ८०० जणांची तपासणी झाली. या वेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, बाजार समितीचे सभापती ठाणसिंग गिरासे, जि. प.चे माजी सदस्य देवमन पवार, सभापती कैलास पाटील, संचालक किशोर पाटील, नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक पप्पू गिरासे, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, एलिम्कोचे डॉ. किरण पावरा आदी उपस्थित होते.
-------
दिव्याशा केंद्र सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरीक आणि दिव्यांग व्यक्तींना गरजू लाभार्थ्यांना मोफत सहाय्यकारी साहित्य मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत मिळेल.
- चंद्रकांत रघुवंशी, आमदार