ॲंकर
-------
BSW26B12200
भुसावळ : व्याख्यानमालेत बोलताना डॉ. पूर्वा ठाकूर.
---------
दिवाळीत आहाराबरोबरच दिनचर्याही महत्त्वपूर्ण
--
डॉ. पूर्वा ठाकूर : अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात विशेष मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता.४ : दिवाळीत आहाराबरोबरच विहार व आपली दिनचर्या महत्त्वाची आहे. बदलत्या ऋतुमानानुसार दिनचर्येचे बदल करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. पूर्वा ठाकूर यांनी व्यक्त केले. त्या येथील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित साप्ताहिक व्याख्यानमालेत ''बदलत्या ऋतूनुसार आहार-विहार, आरोग्याची काळजी व आयुर्वेदिक दिनचर्या’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा अलका ढाके होत्या. डॉ. ठाकूर पुढे म्हणाल्या की, आयुर्वेदानुसार शरद ऋतू व हेमंत ऋतू यांच्यामधील काळ हा ऋतुसंधीचा असतो. या काळात वातावरणातील बदलांचा शरीरावर परिणाम होत असल्याने आहार, विहार व दिनचर्येत योग्य बदल करणे आवश्यक आहे. अभ्यंगस्नानामुळे त्वचेचे आरोग्य, शरीरातील वातदोषाचे संतुलन व स्नायूंना मिळणारा आराम यासाठी तेलाने अभ्यंग करणे आवश्यक आहे. कोमट तेलाने डोक्याची व शरीराची योग्य पद्धतीने मालिश करावी. विशेषतः पायांना तेल लावून मालिश केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते. मात्र अजीर्ण, ताप किंवा काही विशिष्ट शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तींनी अभ्यंग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
दिवाळी सणांचे सांस्कृतिक,
आरोग्यविषयक महत्त्व
आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन आहे. त्यात प्रत्येक ऋतूचा मानवी शरीर, मन व पचनशक्तीवर वेगवेगळा परिणाम होत असतो. हेमंत ऋतूत पचनशक्ती तुलनेने चांगली असते. त्यामुळे प्रकृतीनुसार पौष्टिक व स्निग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा. कोमट पाणी प्यावे, ज्यूसपेक्षा शक्यतो ताजी फळे खावीत. दूध पचण्यास जड वाटत असल्यास मर्यादित प्रमाणात घ्यावे. त्यात हळद, सुंठ किंवा ज्येष्ठमध घालण्याचे फायदेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम
वृद्धावस्थेत शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायाम करणे, कोवळ्या उन्हात काही वेळ बसणे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे, पुरेशी झोप घेणे व तहानेनुसार पाणी पिणे या साध्या पण महत्त्वपूर्ण सवयी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. योगासने, प्राणायाम, ज्ञानवाचन व ध्यानधारणा यांमुळे शरीरासोबत मनालाही शांतता व प्रसन्नता मिळते. केवळ बाह्यआरोग्य नव्हे, तर अंतर्मनाचे आरोग्य जपणेही तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. संघाचे सचिव गजानन सेवलकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक निकम यांनी आभार मानले.