शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा
------------------------------
आमदार बोरसे ः कार्यकर्त्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. ५ : यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, आदींनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, शेतकरी बांधवांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे सणाच्या आनंदात शेतकरी कुटुंबांचाही सहभाग असावा आणि आपण एकटे नसल्याची जाणीव व्हावी, या भावनेतून दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी. बागलाण तालुक्याची अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडित आहे. शेतकरी अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. शेतीशी संबंधित अडचणींचा परिणाम केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होतो.
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी कुटुंबांशी संवाद साधावा, त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा व्यापक सामाजिक संदेश अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे, सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.