एन्कर
--
फोटो : H34537
आनंदाची, मांगल्याची दिवाळी
धनत्रयोदशीपासून भाऊबिजेपर्यंतचा आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : दीपोत्सवाचा आनंदोत्सव सुरू होत असून धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रकाशाचा उत्सव सोनपावलांनी आला आहे. ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, तर ११ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे. प्रत्येक सणाला धार्मिकदृष्ट्या स्वतंत्र महत्त्व असून पूजाविधी करताना तिथी, प्रदोषकाळ आणि शुभमुहूर्त यांना विशेष महत्त्व दिले जाते.
६ नोव्हेंबरला धनत्रयोदशीची पूजा सायंकाळी ६.३० ते रात्री ८.२९ या वेळेत करणे शुभ मानले आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. यमदीपदानाचीही परंपरा आहे. ८ नोव्हेंबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे ५.४२ ते सकाळी ६.४० या वेळेत अभ्यंगस्नानाचा मुहूर्त आहे. उटण्याने स्नान करून दिवाळीची सुरुवात करावी. याच दिवशी लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ६.२२ ते रात्री ८.२२ हा प्रदोषकाळातील शुभमुहूर्त आहे. अमावास्या तिथी सकाळी ११.२७ वाजता सुरू होणार आहे. लक्ष्मी-गणेश पूजन, सरस्वती पूजन आणि व्यापारी वर्गाकडून वहीपूजन केले जाते. १० नोव्हेंबरला बलिप्रतिपदा असून या दिवशी बळी राजाचे पूजन, गोवर्धन पूजा आणि अन्नकूट करण्याची परंपरा आहे. प्रतिपदा तिथी ९ नोव्हेंबरला दुपारी १२.३१ वाजता सुरू होऊन १० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेपर्यंत आहे. ११ नोव्हेंबरला भाऊबीज असून बहिणीने भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याची परंपरा आहे. ओवाळणीचा मुहूर्त दुपारी १.२६ ते ३.४१ असा आहे.
---