शहर टुडे पान चारसाठी
--------------------
शहरातील मोकळे भूखंड
दिवाळीपूर्वी होणार स्वच्छ
-----------
चार जेसीबी उपलब्ध; दहा दिवसांत कचरा हटविणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ व कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने विशेष स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांमध्ये साचलेला कचरा, महामार्गालगतचे ढीग व झाडाझुडपांची सफाई करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून चार जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या यंत्रांच्या मदतीने स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे नियोजन आहे.
शहरातील अनेक प्रभागांत कचरा उचलण्यासाठी उपलब्ध वाहनांची संख्या अपुरी पडत असल्याने मोकळ्या जागांमधील कचरा हटविण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अतिरिक्त यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांत महापालिकेच्या सर्व प्रभागांतील मोकळ्या भूखंडांत साचलेला कचरा हटविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
झाडीझुडपीही काढणार
महापौर काळे यांनी महामार्गाच्या दुतर्फा पडलेला कचरा, बांधकामातील टाकाऊ साहित्य, वाढलेली झाडेझुडपे व ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीगही हटविण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दिवाळीपूर्वी शहरातील अस्वच्छ ठिकाणांची साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे.