फोटो : H34804
कथक, भरतनाट्यम, लोकनृत्याचा थाट
अभिजात अकादमीची रंगली अनोखी दिवाळी पहाट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : शहरापासून काहीशा दूर अंतरावर गावाकडील निसर्गरम्य वातावरणात कथक, भरतनाट्यम तसेच लोकनृत्याचा अनोखा अनुभव उपस्थित रसिकांना लाभला. निमित्त होते, अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी संस्था आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. उपक्रमाचे तिसरे वर्ष होते.
गंगापूर धरणाजवळील अभिजात अकादमी (गुरूकुल) स्टुडिओत शनिवार (ता. ७) पहाटेच्या प्रसन्न प्रहरी एकीकडे दिवस उजाडत असताना, गावाकडच्या गुलाबी थंडीत लोकनृत्य, कथक नृत्य व भरतनाट्यमच्या ‘नृत्यगंगा’ संयुक्त सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भरतनाट्यम नृत्यांगना शिल्पा देशमुख व त्यांच्या विद्यार्थिनींनी ‘नृत्यगंगा’ शैलीतील नृत्याविष्कार सादर केला. अभिजात अकादमीच्या विद्यार्थिनी व गुरू विद्या देशपांडे यांच्या कथक नृत्यातील अभिनय व लयकारीला रसिकांनी भरभरून दाद दिली. महंत महेशदास वैष्णव महाराज, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सरपंच लक्ष्मण बेडकुळे, नितीन पवार, रमेश बापट, शिल्पा देशमुख, विद्या व सुनील देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची सुरवात विविध नृत्यशैलीतील दीपनृत्याने झाली. भरतनाट्यम शैलीतील ‘तांडव नृत्य करी’ गणेश वंदनापाठोपाठ आदर्श शाळेच्या विद्यार्थिनींनी अंबाबाईचा गोंधळ व सरस्वती वंदनाने देवतांची आराधना केली. ‘नृत्यगंगा’ भरतनाट्यमच्या भगिनी शैलीत तराणा व गदिमांचे ‘घट लोण्याचे’ यावरील अभिनय पद सादर करण्यात आले. गंगावऱ्हेच्या व सावरगावच्या विद्यार्थिनींनी ‘तारपा नृत्य’ व तिरंगा फडकवत लोक नृत्य सादर केले. अभिजातच्या विद्यार्थ्यांनी पंडिता रोहिणी भाटे यांचा ‘त्रिवट’ पं. बिरजू महाराज यांचा ‘धमार चतरंग’ सादर केला. नृत्यगुरू विद्या देशपांडे यांनी बिंदादीन महारांचे ‘ऐसे राम’ पद सादर केले. समारोप शुभा मुदगल यांनी गायलेल्या भैरवीने झाली. अदिती गोरे यांनी निवेदन केले.
-----------