धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
फोटो क्रमांक ः 34912
आच्छी ः शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना पालकमंत्री जयकुमार रावल.
---
दुष्काळावर मात करू, शिवार शाश्वत समृद्ध करू
पालकमंत्री रावल ः शेतकऱ्यांसोबत आच्छी, दत्ताणेत दिवाळी; धान्य, भेटवस्तूंचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ ः दुष्काळाने शिवारातील हिरवळ हिरावली असली, तरी शेतकऱ्यांच्या मनातील उद्याची आशा कायम आहे. यंदाची दिवाळी शेतकरी कुटुंबांसाठी आव्हानात्मक असली, तरी या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. बळीराजाच्या कष्टाला आधार देणे, त्याच्या हक्काची मदत वेळेत पोहोचवणे आणि पाण्याच्या शाश्वत व्यवस्थेतून शेतीला पुन्हा उभारी देणे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. दुष्काळाचे सावट दूर करून शिवार समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री रावल यांच्या उपस्थितीत आच्छी व दत्ताणे (ता. शिंदखेडा) येथे दिवाळी भेट व अन्नधान्य वितरण कार्यक्रम झाला. बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, माजी सभापती जिजाबाराव पाटील, माजी सरपंच अण्णा इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य नारायणसिंग गिरासे, राहुल पाटील, विश्वनाथ पाटील, दिनेश पोतदार, तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावार, पुरवठा निरीक्षक धनराज पाटील यांच्यासह शेतकरी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मदत वेळेत पोहचवू
पालकमंत्री रावल म्हणाले, की यंदा पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन सप्टेंबरमध्ये मदतीचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी स्थितीच्या पहिल्याच यादीत धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा समावेश करण्यात आला. दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांना मदत मिळण्याबरोबरच ती योग्य वेळी मिळणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सणाच्या काळात शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. पुढील टप्प्यातील मदतही पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
धान्य, साड्यांचे वाटप
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा या उद्देशाने आच्छी व दत्ताणे येथे अन्नधान्य आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील १४ हजार ३१४ अंत्योदय महिला लाभार्थ्यांसाठी साड्यांच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात दिवाळीपूर्वी अन्नधान्याचे वाटप पूर्ण करण्यात आले असून, सुमारे १ लाख ९५ हजार लाभार्थ्यांपर्यंत ज्वारी, गहू, साखर, तांदूळ आदी अन्नधान्य पोहोचवण्यात आल्याचे सांगत पुणे मर्चंट चेंबरच्या सहकार्याने दिवाळी भेटवस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.