जास्त आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी
जिल्हाधिकारी : मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : पर्यावरण सुरक्षा नियमानुसार १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळी सणासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
यंदा ६ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दीपावली सण सर्वत्र साजरा होणार आहे. दीपावली सणासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री व साठवणूक करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे. फटाक्यांसाठी १०० किलो ग्रॅम व शोभेचे झकाकणारे स्मार्कलर्स, ग्रीन क्रेकर्स फटाक्यांसाठी ५०० किलो ग्रॅम एवढ्या परिमाणापेक्षा जास्त परिणाम बाळगता येणार नाही. फटाके विक्रींसाठी स्टॉलची संख्या एका ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉलमधील अंतर तीन मीटरपेक्षा कमी नसावे. प्रत्येक स्टॉलमधील फटाक्यांची एकूण परिमाणता ५०० किलो ग्रॅमपेक्षा अधिक नसावी. प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र १० बाय २० चौरस मीटरपर्यंतचे असावे. फटाका विक्री स्टॉलजवळ अग्निसुरक्षा व्यवस्था आणि पाण्याचे साठे ठेवणे आवश्यक असेल. फटाका विक्री परिसरात दक्षता पथकाची गस्त असावी, फटाका विक्री स्टॉलच्या परिसरात धुम्रपान प्रतिबंधीत राहील, असे नियम घालण्यात आले आहेत.