(फटाक्यांचे संग्रहित चित्र वापरावे)
---
दुष्काळाचा फटाके विक्रीलाही फटका
जिल्ह्यात विक्रीत ४० टक्क्यांची घट; पाच ते सहा कोटींची उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : ‘एलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेसह व्यवसायांनाही बसला आहे. दिवाळीत रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण असले, तरी आर्थिक अडचणींमुळे यंदा सणाचा उत्साह मर्यादित राहिला. ग्रामीण भागातील नागरिकांनी फटाके खरेदीला कात्री लावल्याने जिल्ह्यात फटाके विक्रीत सुमारे ४० टक्क्यांची घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत दिवाळीत फटाके खरेदीचा उत्साह वाढला होता. मात्र यंदा पावसाचा खंड, पिकांचे घटलेले उत्पादन आणि शेतीवरील खर्चामुळे अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने ग्रामीण ग्राहकांनी खरेदीत हात आखडता घेतला. जळगाव शहरात यंदा फटाक्यांची २५घाऊक दुकाने तर १५० किरकोळ दुकाने होती. तसेच जिल्ह्यातील ७८० घाऊक दुकाने होती. या दुकानांवर लहान फटाक्यांची जास्त विक्री झाली. मोठ्या आवाजाचे आणि महागडे फटाके टाळून कमी किमतीच्या फुलबाज्या, भुईचक्र, अनार आणि लहान फटाक्यांना पसंती दिली गेली. दरवर्षी फटाके विक्रेत्याचे आठ ते दहा कोटींचे फटाके विक्री होत होते. यंदा मात्र पाच ते सहा कोटींचे फटाके विक्री झाल्याचा अंदाज आहे.
--------
कोट
दुष्काळामुळे यंदा फटाके विक्रीत घट झाली आहे. कधी नव्हे तेवढी घट यंदा होती. दिवाळीच्या १५ दिवस आधीपासूनच फटाके विक्रीसाठी गर्दी होत असे. यंदा मात्र दिवाळी सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी गर्दी झाली. त्यातही उलाढाल कमी झाली. आमचा अजून ३० टक्के स्टॉक शिल्लक आहे.
- युसूफ मकरा,
संचालक, फटाका कारखाना, जळगाव
----