फोटो ओळी- 12288
कळवाडी : येथे झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी जमलेले मित्र.
कळवाडी येथे दिवाळीनिमित्त स्नेहमेळावा
शालेय आठवणींना उजाळा; दरवर्षी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. १६ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नात्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा काळ. धकाधकीच्या जीवनात एकमेकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. कळवाडी येथील व परिसरातील दापूरे, नरडाणे, साकूर येथील एकत्र शिक्षण घेतलेले मित्र दर वर्षी दिवाळीनिमित्त एकत्र येतात. यंदाही यानिमित्त स्नेहमेळावा झाला. या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी मित्रांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शालेय जीवनातील आठवणी, एकत्र घालवलेले क्षण आणि आयुष्यातील विविध अनुभवांच्या आठवणींनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले. साधेपणाने झालेल्या या भेटीगाठींमधून मैत्रीतील जिव्हाळा आणि आपुलकीचा प्रत्यय आला. केवळ सणापुरते एकत्र न येता मैत्रीचा हा ऋणानुबंध कायम जपण्याचा निर्धारही मित्रांनी व्यक्त केला.
यातील बहुतांश गाव परिसरापासून दूर असतात. त्यामुळे ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ ही भावना जपतात. यानिमित्ताने गावातील शाळांना मदतीचा हात देण्यासह सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निर्धार करून भेटीगाठी घेऊन ‘गड्या आपुला गाव बरा’ म्हणत एकमेकांना निरोप दिला.
------------
कोट
मैत्रीचा गोडवा आणि गावाकडच्या मातीशी असलेली नाळ या स्नेहमेळाव्यातून अधोरेखित झाली आहे. काळ बदलतो, माणसं कामानिमित्त दूर जातात; मात्र मैत्रीचे ऋणानुबंध कधीच अंतराने कमी होत नाहीत. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच गावातील शाळांसाठी मदतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा घेतलेला संकल्प कौतुकास्पद आहे.
- शशिकांत भदाणे, दापुरे
---------