ऐन दिवाळीत सुवासिनींच्या मंगळसूत्रांवर डल्ला
पोलिसांसमोर आव्हान; सोनसाखळी चोरांचा उपद्रव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : शहरात सोनसाखळी चोरांचा उपद्रव पुन्हा वाढला असून, मखमलाबाद रोड आणि जनरल वैद्यनगर भागात घडलेल्या दोन घटनांमध्ये दुचाकीस्वारांनी पादचारी दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ, मुंबई नाका पोलिस ठाण्यांत जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारी (ता. ४) सायंकाळी फिर्यादी सीमा विश्वास खैरनार ( ५०, रा. कृष्णा रो-हाउस, स्वामी विवेकानंदनगर) या मखमलाबाद गावातील स्मशानभूमीत एका नातेवाईकाच्या अंत्यविधीचे कार्य आटोपून एकट्याच पायी परतत होत्या. खंडेराव मंदिरासमोर आल्या असता, मागून पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादीला पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि सीमा खैरनार या सांगत असतानाच, संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ३२ हजारांचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाडले. त्यानंतर दोन्ही चोर राऊ हॉटेलच्या दिशेने वेगाने पसार झाले. पुढील तपास हवालदार सतीश लाळू वसावे करत आहेत.
तर, दुसरी घटना मंगळवारी (ता.३) रात्री जनरल वैद्यनगर भागात घडली. फिर्यादी परिगा बाबुराव भिंगारदिवे (६८) या पतीसह काठे गल्ली सिग्नलकडून भाजीपाला घेऊन पायी घरी परतत होत्या. पौर्णिमा बस स्टॉपकडून बालाजी किराणा समोरून दुचाकीवर आलेल्या एका इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे आणि ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे जोरदार आरडाओरडा केला, पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरटा वेगाने पसार झाला. हवालदार प्रवीण रामचंद्र कुलथे तपास करत आहेत.