टुडे पान ३ : मेन फिचर
(संग्रहित स्केच वापरावे)
----
वातावरणातील बदलाने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण; ज्येष्ठ नागरिकांसह मुलांची काळजी घेण्याचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळच्या वेळी जाणवणारा गारवा, दुपारच्या वेळी वाढणारा उन्हाचा चटका आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच अॅलर्जीचा त्रास जाणवल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातून केले जात आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी, खरेदीसाठी घराबाहेर पडणारे नागरिक, प्रवास आणि बदललेल्या दैनंदिन दिनक्रमामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरत आहे. सकाळी घराबाहेर पडताना जाणवणारा गारवा आणि दुपारी उन्हात फिरताना जाणवणारी उष्णता यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. त्यातच अपुरी झोप, अनियमित आहार आणि पाण्याचे कमी सेवन यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता असते.
तापमानातील चढ-उतार
दिवसातील वेगवेगळ्या वेळांमध्ये तापमानात जाणवणारा फरक हा नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. सकाळी आणि रात्री थंडावा जाणवत असताना दुपारी उष्णता वाढल्यास कपड्यांची निवड, आहार आणि दिनचर्येत योग्य बदल करणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची रोगप्रतिकारक क्षमता किंवा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता तुलनेने कमी प्रभावी असू शकते. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
बदलत्या वातावरणात सर्दी, शिंका येणे, नाक वाहणे, घशात खवखव, खोकला आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, ही लक्षणे केवळ तापमानातील बदलामुळेच होतात असे नाही. विषाणूजन्य संसर्ग, धूळ, धूर आणि इतर अॅलर्जीकारक घटकांचाही त्यामागे सहभाग असू शकतो. त्यामुळे लक्षणांचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
काळजी आवश्यक
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड झाकणे, हात नियमित स्वच्छ धुणे आणि आजारी असताना शक्यतो गर्दी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळल्यास संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. याशिवाय धूळ आणि धुरामुळे दमा किंवा श्वसनविकार असलेल्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. अशा रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. स्वतःहून औषधे, विशेषतः प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स), घेणे टाळावे.
चौकट
आरोग्याची काळजी कशी घ्याल?
बदलत्या वातावरणात पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप आणि नियमित स्वच्छता यांना महत्त्व आहे. सकाळी गारवा असल्यास आवश्यक तेवढे उबदार कपडे वापरावेत. दुपारच्या उन्हात दीर्घकाळ फिरणे टाळावे. लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ताप, अशक्तपणा किंवा श्वसनाचा त्रास जाणवत असल्यास तातडीने लक्ष द्यावे.
कोट
वातावरणातील तापमानात होणारे चढ-उतार, धूळ आणि धुरामुळे काही नागरिकांना सर्दी, खोकला, घसादुखी तसेच अॅलर्जीचा त्रास जाणवू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा आणि पुरेशी झोप घ्यावी.
- डॉ. प्रदीप चौधरी, जळगाव